TMKOC | ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ; अभिनेत्रीच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विरोधात तिने आता मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. जेनिफरने असित मोदी यांच्यासोबतच प्रॉडक्शन टीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिने पवई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकणी अद्याप एफआयआर दाखल झाली नाही.
काय म्हणाले मुंबई पोलीस?
‘तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेत्रीने निर्मात्यांविरोधात लैंगित शोषणाची लेखी तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार, निर्माते असित मोदी आणि इतर काही क्रू मेंबर्सनी तिचं लैंगिक शोषण केलं आहे. मात्र याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही. आम्ही याप्रकरणाची चौकशी सुरू केली असून लवकरच संबंधित लोकांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे’, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Actress from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah has filed a written complaint against a producer alleging sexual harassment. According to her complaint, producer Asit Modi and some crew members sexually harassed her. However, an FIR has yet to be registered. We have started an…
— ANI (@ANI) May 12, 2023
नेमकं काय घडलं?
जेनिफरने दोन महिन्यांपासून मालिकेत काम करणं बंद केलं. यामागचं कारण विचारलं असता निर्मात्यांवर आरोप करत ती म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”
निर्माते असितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया-
“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.