सर्वात मोठी बातमी ! अभिनेत्री जिया खान प्रकरणात सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सुरज पांचोली यांची…
अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरणाचा तब्बल दहा वर्षानंतर निकाल आला आहे. सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सुरज पांचोली याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबई : अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरणी सर्वात मोठी बातमी आहे. जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सुरज पांचोली याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सबळ पुराव्याच्या अभावी कोर्टाने सूरजची मुक्तता केली आहे. सीबीआय कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे सुरज पांचोली याला मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल दहा वर्षानंतर हा निकाल आला आहे.
जिया खान 3 जून रोजी 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या मृत्यूप्रकरणात सूरज पांचोलीचं नाव आलं होतं. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. जियाच्या आईनेही सूरजवर आरोप करून त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं. मात्र, सीबीआयने पुराव्या अभावी सूरज पांचोली याला निर्दोष मुक्त केलं.
कोर्ट म्हणाले…
सूरज विरोधात कोणताच खटला होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. तर कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सूरजने कोर्टाचे आभारही मानले. या निकालावर सूरजची आई अभिनेत्री जरीना वहाब यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, जियाची आई राबिया या निर्णयाने खूश नाहीये.
सकाळीच कोर्टात पोहोचला
आज सकाळीच सूरज पांचोली कोर्टात पोहोचला. यावेळी त्याला मीडियाने घेरलं. पण त्याने कुणाशीही बातचीत केली नाही. जरीना वहाब सुद्धा सूरज सोबत होत्या. कोर्टाचा निकाल लवकर येणार होता. पण जियाची आई राबिया यांनी काही लिखित गगोष्टी जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे कोर्टाने दुपारी साडेबारा नंतर निकाल देणार असल्याचं म्हटलं होतं.
सुसाईड नोटने अडचण
दरम्यान, जिया खानने आत्महत्या केली तेव्हा तिच्याकडे सुसाईड नोट सापडली होती. त्यात तिने सूरजसोबत आपलं प्रेम असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, सूरजने आपल्याशी चुकीचं वर्तन करण्यास सुरुवात केली होती. सूरजने एकदा मला घरातून बाहेरही काढलं होतं. त्याच्या या वागण्याने मी दुखी झाले होते, असं सूसाईडनोटमध्ये म्हटलं होतं. सूरजच्या सांगण्यावरूनच जियाने गर्भपात केल्याचा दावाही जियाच्या आईने केला होता.