Kajol: ट्रोलिंगबद्दल काजोलचा लेकीला मोलाचा सल्ला; म्हणाली “तेच प्रसिद्ध होतात जे..”
"जेव्हा न्यासा ट्रोल होते.. ", काजोलने मुलीबद्दल व्यक्त केली भावना
मुंबई: अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक न्यासा देवगण सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही, मात्र तरीही सोशल मीडियावर तिचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. स्टारकिड न्यासाचे सोशल मीडियावर अनेक फॅन पेजेस आहेत, ज्यावर तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जातात. मात्र अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. न्यासा कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होते. या ट्रोलिंगवर आता आई काजोलने प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर न्यासाला ट्रोल करणाऱ्यांबद्दल काजोल काय विचार करते, हे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. एक आई म्हणून मला नक्कीच वाईट वाटतं, मात्र न्यासासाठी चांगलं बोलणारेही खूप आहेत, असं काजोल म्हणाली. न्यासा ही काजोल आणि अजयची मोठी मुलगी आहे. त्यांना युग हा मुलगासुद्धा आहे.
“ट्रोलिंग हा सोशल मीडियाचा एक विचित्र भाग बनला आहे, असं मला वाटतं. सोशल मीडियावर 75 टक्के ट्रोलिंगच होत असते. तुम्ही ट्रोल झालात म्हणजे लोकांनी तुमची दखल घेतली. जर तुम्हाला ट्रोल केलं गेलं, म्हणजे तुम्ही प्रसिद्ध झालात. जोपर्यंत ट्रोल केलं जात नाही, तोपर्यंत तुम्ही प्रसिद्धच नाही, असं वाटतं”, अशी उपरोधिक प्रतिक्रिया काजोलने या मुलाखतीत दिली.
View this post on Instagram
मात्र एक आई असल्याने न्यासाला ट्रोल केल्यास वाईट वाटत असल्याची भावनाही तिने बोलून दाखवली. “अशा ट्रोलिंगचे पोस्ट मी स्वत: पाहते. पण 100 पैकी 2 जण तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात आणि त्याच दोघांची कमेंट प्रकाशझोतात येते. हीच गोष्ट मी माझ्या मुलीला समजावते. जर एखादा व्यक्ती तुम्हाला बोलत असेल की अमुक एक गोष्ट तुमची वाईट आहे, तर त्यात दहा हजार अशीही लोकं आहेत जे तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतात. तुम्ही आरशात जे बघता तेच सर्वांत महत्त्वाचं असतं”, असं काजोल पुढे म्हणाली.
न्यासा सध्या स्वित्झर्लंडमध्ये उच्चशिक्षण घेतेय. याआधी तिने सिंगापूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं. आईवडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करिअर करावं की नाही याचा निर्णय अद्याप न्यासाने घेतला नाही, असं अजयने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती आईची भूमिका साकारतेय. रेवती मेनन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.