कपिल शर्माला ‘हार्ट अटॅक वाला पराठा’ खाऊ घालणं पडलं महागात; थेट FIR दाखल
पंजाबच्या जालंधरमधील मॉडल टाऊन याठिकाणी मिळणारा 'हार्ट अटॅक वाला पराठा' खूप लोकप्रिय आहे. देशाच्या विविध ठिकाणांहून लोक इथे तो पराठा खाण्यासाठी येतात. कॉमेडियन कपिल शर्मासुद्धा काही दिवसांपूर्वी पत्नी गिन्नीसोबत याठिकाणी पराठे खाण्यासाठी आला होता.
जालंधर : 1 जानेवारी, 2024 | पंजाबमधील जालंधर इथल्या मॉडल टाऊनमध्ये मिळणारे ‘हार्ट अटॅक वाले पराठे’ खूप लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावरही हे पराठे व्हायरल झाले होते. मात्र ‘हार्ट अटॅक वाले पराठे’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वीर दविंदर सिंहला कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी छत्रथला पराठे खाऊ घालणं महागात पडलं आहे. रात्री उशिरापर्यंत पराठ्यांचं दुकान सुरू ठेवल्यामुळे ठाणे 6 च्या पोलिसांनी कलम 188 अंतर्गत वीर दविंदर सिंहविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तर दुसरीने वीरने पोलिसांवर मारहाणीचा आणि रुममध्ये बंद करून त्याच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत सांगितली घटना
जालंधर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषगेत वीर दविंदर सिंहने एसएचओ अजायब सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “मी पराठे विकून माझ्या घराचा गाडा चालवतो आणि रात्रीच्या वेळी मी मॉडल टाऊन याठिकाणी माझी दुकान चालवत होतो. काही दिवसांपूर्वीच माझ्या दुकानावर कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या कुटुंबीयांसोबत खास माझे पराठे खाण्यासाठी आला होता. पोलिसांना ज्यावेळी समजलं की कपिल शर्मा तिथे येऊन गेला, तेव्हा एसएचओंनी मला मारहाण केली आणि खोलीत बंद केलं. अनेक तासांपर्यंत त्यांनी मला एका खोलीस बंद करून ठेवलं होतं. माझ्यासोबत गैरवर्तणूक करण्यात आली. माझ्यासोबत असं करणाऱ्या एसएचओंवर कडक कारवाई व्हावी”, अशी मागणी त्याने केली आहे.
पोलिसांची बाजू
दुसरीकडे एसएचओ अजायब सिंह हे या आरोपांवर बोलताना म्हणाले, “मॉडल टाऊनजवळ राहणाऱ्या काही स्थानिकांनी तक्रार केली की वीर दविंदर सिंह रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत पराठ्यांचं दुकान चालवतो. लोक दूरदूरून त्याचे पराठे खाण्यासाठी येतात आणि इथे गर्दी करतात. त्यामुळे परिसरात घाण आणि कचरा पसरतोय. याविषयी एसपी हेट क्वार्टरनेही वीर दविंदर सिंहला समजावलं होतं. पण तरीसुद्धा त्याने ऐकलं नाही. अखेर पोलीस कर्मचाऱ्यांना त्याच्या दुकानावर पाठवलं तेव्हा त्याने गैरवर्तणूक केली. त्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. त्यानंतरच वीर दविंदर सिंहविरोधात 188 कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.”