गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’नंतर आता कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी दणक्यात कमाई केली आहे. बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. आता ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 14.11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) करिअरमधील हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दुसऱ्या दिवशी या कमाईतही चांगली वाढ पहायला मिळाली. शनिवारी ‘भुल भुलैय्या 2’ने 18.34 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने 30 कोटींचा आकडा पार केला आहे. कंगना रनौतचा ‘धाकड’ (Dhaakad) हा चित्रपटसुद्धा शुक्रवारी प्रदर्शित झाला. कंगनानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘भुल भुलैय्या 2’चं कौतुक केलं आहे.
पहिला दिवस- 14.11 कोटी रुपये
दुसरा दिवस- 18.34 कोटी रुपये
एकूण- 32.45 कोटी रुपये
#BhoolBhulaiyaa2 hits the ball out of the park on Day 2… Biz jumps across #India… Wins over youngistaan *and* families, metros *and* mass pockets… Eyes ₹ 55 cr [+/-] weekend, strong chance of going past ₹ ? cr… Fri 14.11 cr, Sat 18.34 cr. Total: ₹ 32.45 cr. #India biz pic.twitter.com/6zKGoGYqZ7
— taran adarsh (@taran_adarsh) May 22, 2022
अनीस बाझमी दिग्दर्शित ‘भुल भुलैय्या 2’मध्ये कार्तिक आर्यनसह कियारा अडवाणी आणि तब्बूचीही भूमिका आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’चा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार आणि विद्या बालनने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सीक्वेलमध्ये मंजुलिका हे पात्र आणि तिचं ‘आमी जे तोमार’ हे गाणं सोडल्यास पहिल्या भागाशी काहीही साम्य नाही.
गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त तीन कोटी रुपये कमावले होते. अजय देवगणचा ‘रनवे 34’, जॉन अब्राहमचा ‘अटॅक’, शाहिद कपूरचा ‘जर्सी’ आणि टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही.