KBC 15 ला भेटला पहिला करोडपती; 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष, 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार?
कौन बनेगा करोडपतीचा पंधरावा सिझन चांगलाच गाजतोय. या सिझनला पहिला करोडपती भेटला आहे. पंजाबच्या 21 वर्षीय तरुणाने ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मात्र तो सात कोटी रुपये जिंकण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चा पंधरावा सिझन सध्या सुरू आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या सिझनचं सूत्रसंचालन करत आहेत. ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणाऱ्या या शोचे असंख्य चाहते आहेत. या नव्या सिझनचा पहिला करोडपती नुकताच जाहीर झाला आहे. पंजाबच्या 21 वर्षीय तरुणाने शोमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. आता सर्वांची नजर सात कोटी रुपयांसाठीच्या प्रश्नावर आहे. सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम हँडलवर गुरूवारी नवा प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये एक कोटी रुपये विजेत्याचं नाव घोषित करण्यात आलं आहे.
21 वर्षीय तरुणाने जिंकले 1 कोटी रुपये
‘पंजाबमधील खालरा या छोट्याशा गावातून आलेला जसकरण प्रत्येक अडचण पार करत सात कोटी रुपयांच्या प्रश्नावर येऊन पोहोचला आहे. येत्या 4 आणि सप्टेंबर रोजी (सोमवार-मंगळवार) रात्री 9 वाजता हा एपिसोड प्रसारित होणार आहे’, अशी माहिती या प्रोमोद्वारे देण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये जसकरण एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर अचूक देतो आणि त्यानंतर बिग बी खुश होऊन त्याला मिठी मारतात.
View this post on Instagram
7 कोटी रुपयांची उत्सुकता
याशिवाय शोचा आणखी एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन सात कोटी रुपयांच्या प्रश्नाबाबत बोलताना दिसत आहेत. 2000 मध्ये हा शो सुरू झाल्यानंतर अनेक स्पर्धकांना कोट्यवधींची रक्कम जिंकताना पाहिल्याचं ते सांगतात. मात्र सात कोटी रुपयांचा 16 वा प्रश्न कोणी सहज पार करू शकला नाही. या नव्या प्रोमोमध्ये सात कोटींच्या प्रश्नावर जसकरणला पाणी पिताना आणि विचार करताना दाखवलं गेलंय. त्यामुळे तो यशस्वी ठरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
View this post on Instagram
नऊ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार?
याआधी दोन भावंडांनी केबीसीमध्ये सात कोटी रुपये जिंकले होते. हे जवळपास नऊ वर्षांपूर्वी घडलं होतं. केबीसीच्या आठव्या सिझनमध्ये अचिन नरुला आणि सार्थन नरुला या भावंडांनी सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं होतं. त्यांचा हा विक्रम अद्याप कोणी मोडू शकला नाही. त्यामुळे 21 वर्षीय जसकरण हा विक्रम मोडू शकणार का, हे आगामी एपिसोड्समध्ये पहायला मिळेल.