14 वर्षांच्या मयांकने ‘केबीसी’मध्ये जिंकले 1 कोटी रुपये; जाणून घ्या काय होता प्रश्न?
कौन बनेगा करोडपती हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. यामध्ये ज्ञानाच्या जोरावर स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम जिंकता येते. नुकताच या शोमध्ये 14 वर्षांच्या मयांकने एक कोटी रुपये जिंकले आहेत. त्याची खेळी पाहून अमिताभ बच्चनसुद्धा थक्क झाले होते.
मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये नुकताच एक 14 वर्षांचा मुलगा करोडपती ठरला आहे. या शोच्या इतिहासातील हा सर्वांत कमी वयाचा स्पर्धक आहे, ज्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत. या मुलाचं नाव मयांक असून तो मूळचा हरयाणाचा आहे. मयांकने केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. स्पेशल केबीसी ज्युनियर वीकदरम्यान मयांकने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. हरयाणाच्या महेंद्रगड इथल्या मयांकने मंगळवारच्या एपिसोडमध्ये भाग घेतला होता. आठवीत शिकणाऱ्या मयांकचं ज्ञान पाहून सर्वजण थक्क झाले होते. विशेष म्हणजे त्याने 3.2 लाख रुपयांपर्यंत एकसुद्धा लाइफलाइन वापरली नव्हती. त्यानंतर थेट 12.5 लाख रुपयांच्या प्रश्नासाठी त्याने पहिल्यांदा लाइफलाइनचा वापर केला होता.
एक कोटी रुपयांच्या मेगा प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मयांकच्या डोळ्यात अश्रू आले. ‘नव्याने सापडलेल्या खंडाला अमेरिका हे नाव असलेला नकाशा तयार करण्याचं श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला जातं’, असा प्रश्न त्याला एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता. यासाठी त्याला चार पर्याय देण्यात आले होते. A- अब्राहम ओर्टेलियस B- गेराडस मर्केटर, C- जियोवानी बॅटिस्टा अग्निसी आणि D- मार्टिन वाल्डसिम्युलर असे हे पर्याय होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर मार्टिन वाल्डसिम्युलर असं होतं. मयांकने हे अचूक उत्तर देऊन एक कोटी रुपये आपल्या नावावर केले. त्यानंतर त्याला सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्याचं योग्य उत्तर माहीत नसल्याने त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
हरियाणा के महेंद्रगढ़ के लाल, आठवीं कक्षा के होनहार छात्र मयंक ने KBC जूनियर में अपने ज्ञान और कौशल से 1 करोड़ रुपये की राशि जीतकर प्रदेश का नाम रोशन किया है।
जीनियस बेटे के पिता से फ़ोन पर बात कर उन्हें बधाई दी और मयंक के उज्जवल भविष्य की कामना की। pic.twitter.com/NjDeKo4xD3
— Manohar Lal (@mlkhattar) November 27, 2023
एक कोटी रुपये जिंकल्यानंतर मयांकचं हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीसुद्धा अभिनंदन केलं. या विजयाविषयी बोलताना मयांक म्हणाला, “सर्वांत कमी वयाचा स्पर्धक असून केबीसीमध्ये इतकी मोठी रक्कम जिंकणं ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. माझ्या पालकांनी सतत माझं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण खेळादरम्यान मला अमिताभ बच्चन सर सतत प्रोत्साहन देत होते, त्यामुळे मी त्यांचाही आभार आहे.”