गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत गुलाम देशांतून लुटलेल्या मौल्यवान वस्तू परत कराव्यात अशी मागणी विविध देशांतील लोक करू लागले आहेत. यातील एक मौल्यवान वस्तू म्हणजे कोहिनूर हिरा (Kohinoor). ज्यावर भारताचा हक्क आहे असं म्हटलं जातं. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ते भारताला परत करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. आता कोहिनूर हिऱ्याच्या वादात अभिनेत्री रवीना टंडननेही (Raveena Tandon) उडी घेतली आहे. तिने नुकताच जॉन ऑलिव्हरचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये कॉमेडीयन आणि समालोचक जॉन ऑलिव्हर हा ब्रिटीशांच्या चोरीच्या सवयीची खोड काढताना दिसत आहे. इंग्रजांनी भारतातून कोहिनूर हिरा कसा हिसकावून घेतला आणि तो आता परत का करत नाही, हे तो सांगताना दिसत आहे. ब्रिटनने भारताव्यतिरिक्त इतर देशांतून अनेक मौल्यवान वस्तू चोरल्याचा दावाही जॉनने या व्हिडिओमध्ये केला आहे.
जॉन ऑलिव्हर म्हणतो, “भारतातील काही लोक कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी करत आहेत. हा कोहिनूर हिरा भारताकडून हिसकावून 1850 साली राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला होता. नंतर त्याला शाही मुकुटात स्थान देण्यात आलं. कोहिनूर जडलेला हा मुकुट नंतर राणी एलिझाबेथ II ने 1953 मध्ये तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी परिधान केला होता.” कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास ब्रिटन कसा नकार देत आहे, याचीही जॉनने खिल्ली उडवली. त्याने व्हिडिओमध्ये ब्रिटिश सरकारची प्रतिक्रियाही दाखवली.
Just fantastic! His Punchline ??” The entire British museum should be declared an active crime scene!” pic.twitter.com/tNk0K1VWNZ
— Raveena Tandon (@TandonRaveena) September 13, 2022
जॉनने पुढे सांगितलं की “ब्रिटनमध्ये चोरी करण्याची प्रवृत्तीच आहे. ब्रिटिश संग्रहालयातील प्रत्येक गोष्ट चोरीची आहे. जर ब्रिटनने चोरीच्या वस्तू परत करण्यास सुरुवात केली तर ते संग्रहालय रिकामं होईल.” जॉनने ब्रिटिश म्युझियमला ’ॲक्टिव्ह क्राईम सीन’ असंच म्हटलं आहे. जॉन ऑलिव्हरचा हा व्हिडिओ पाहून रवीना टंडनलाही हसू आवरता आलं नाही.
कोहिनूर हिरा कोल्लूरच्या खाणीतून काढण्यात आल्याचं सांगितलं जातं. यानंतर 1310 मध्ये दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिल्जीने कोहिनूर हिरा ताब्यात घेतला. पण कोहिनूर हा केवळ खिल्जीच्या हातीच गेला नव्हता. पुढे तो हुमायून, शेरशाह सुरी आणि शाहजहानपासून औरंगजेबपर्यंत आणि नंतर पटियालाच्या महाराजा रणजित सिंगपर्यंत गेला. पुढे भारताच्या राजवटीत इंग्रजांनी कोहिनूर हिरा हिरावून सोबत नेला.