Pushpa 2 | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ची बॉलिवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली; म्हणाला..
केआरकेच्या या ट्विटवर अल्लू अर्जुनचे चाहते चांगलेच भडकले आहेत. 'माझ्या मित्रा.. पिक्चर अजून बाकी आहे' असं एकाने लिहिलं. तर 'तुला समजलं असतं तर आज तू केआरके नसता' अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली.
मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘पुष्पा : द रूल’ सध्या जोरदार चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला. पुष्पा 2 च्या पोस्टरमध्ये त्याचा थक्क करणारा लूक पहायला मिळाला. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनने साडी नेसली असून त्याच्या गळ्यात लिंबूंची माळ आहे. याशिवाय त्याने बांगड्या, अंगठ्या आणि गळ्यात नेकलेससुद्धा घातले आहेत. त्याच्या कपाळावर टिकली आणि हातात बंदूक पहायला मिळतेय. सोशल मीडियावर हा पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र त्याच्या याच लूकची खिल्ली एका बॉलिवूड अभिनेत्याने उडवली आहे.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 च्या पोस्टरची खिल्ली उडवणारा बॉलिवूड अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल आर खान आहे. ट्विटरवर या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं, ‘मी संभ्रमात आहे. हा लक्ष्मी 2 चा पोस्टर आहे की कंचना 2 चा? मला तरी हा पुष्पाच्या सीक्वेलसारखा अजिबात वाटत नाहीये.’
This is the poster of #Pushpa2 and I am confused. I can’t understand, it’s #Laxami2 or #Kanchana? It doesn’t look Pushpa sequel at all. pic.twitter.com/HRKHjuhR1o
— KRK (@kamaalrkhan) April 7, 2023
केआरकेच्या या ट्विटवर अल्लू अर्जुनचे चाहते चांगलेच भडकले आहेत. ‘माझ्या मित्रा.. पिक्चर अजून बाकी आहे’ असं एकाने लिहिलं. तर ‘तुला समजलं असतं तर आज तू केआरके नसता’ अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली. ‘तू कितीही टीका केलीस तरी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता दुसऱ्या भागात काहीतरी हटके दाखवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. यासाठी चित्रपटातील काही सीन्सचं शूटिंग खतरनाक लोकेशन्सवर करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जवळपास 178 हत्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी ही शूटिंग होणार असल्याचं कळतंय.
चित्रपटाचे प्रॉडक्शन मॅनेजर पी. व्यंकटेश्वर राव यांनी निर्णय घेतलाय की ओडिशाच्या मल्किन जिल्ह्यातील स्वाभिमान अंचलमध्ये शूटिंग केली जाईल. या परिसरात 2008 ते 2021 या कालावधीत माओवादी हिंसा पहायला मिळाली. या हिंसेत आजवर तब्बल 178 हत्या झाल्या आहेत. यात नागरिकांसोबतच सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या शूटिंगसाठी निर्मात्यांनी मलकानगिरी जिल्ह्याचे कलेक्टर आणि पोलीस अधिक्षकांची परवानगीसुद्धा घेतली आहे. या परिसरात ड्रोन कॅमेराने शूटिंग केली जाईल आणि जवळपास 200 लोक तिथे उपस्थित असतील.