‘आता फक्त दोनच पर्याय उरतात..’; कुणाल कामराच्या नव्या पोस्टने वेधलं सर्वांच लक्ष
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या नव्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.. अशा शीर्षकाची पोस्ट त्याने लिहिली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. 5 एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांनी कुणालला हे समन्स पाठवले आहेत. याआधी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. परंतु तरीही कुणाल चौकशीसाठी उपस्थित राहिला नव्हता. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या वादानंतरही तो सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि स्टँडअप कॉमेडीचे व्हिडीओ शेअर करत आहे. आता कुणालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे.
एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी काही संतप्त शिवसैनिकांनी कुणालच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. ‘कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन’ असं शीर्षक लिहित त्याने एकंदर परिस्थितीवर निशाणा साधला आहे.




कुणाल कामराची पोस्ट-
‘कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन 1- आक्रोश- त्यांच्या कामासाठी ब्रँड्सने जाहिराती मिळवून देणं बंद करण्यासाठी पुरेसं आहे. 2- अधिक आक्रोश करा- खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम संपेपर्यंत 3- आणखी मोठा आक्रोश करा- जेणेकरून मोठमोठी ठिकाणं जोखीम घेणार नाहीत. 4- हिंसक आक्रोश करत रहा- जोपर्यंत सर्वांत लहान ठिकाणंदेखील कार्यक्रमांसाठी त्यांचे दरवाचे बंद करत नाहीत. 5- त्यांच्या प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलवा- कलेचं ठिकाण गुन्हेगारीच्या ठिकाणात बदला. आता कलाकाराकडे फक्त दोनच पर्याय उरतात: एकतर त्यांचा आत्मा विकून डॉलरची कठपुतळी बनणं किंवा मौन बाळगून कोमेजणं हे फक्त प्लेबुक नाही, हे एक राजकीय शस्त्र आहे, गप्प बसवण्याचं एक यंत्र आहे,’ असं त्याने लिहिलंय.
View this post on Instagram
दरम्यान सोमवारी कुणाल कामराच्या माहीम इथल्या घरी मुंबई पोलिसांचं पथक गेलं होतं. पोलिसांनी कामराला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक सोमवारी कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेलं होतं. या पाहणीवरूनही कुणालने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून त्याने अधिकाऱ्यांवर वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय केल्याबद्दल जोरदार टीका केली. कामराने किमान दहा वर्षांपासून त्या पत्त्यावर राहत नसल्याचं सांगून तामिळनाडूतील त्याच्या सध्याच्या घराच्या टेरेसवरून स्वत:चा एक फोटो शेअर केला होता.