“त्या शोमध्ये जाण्यापेक्षा मेंटल हॉस्पिटल परवडलं”; कुणाल कामराचा थेट नकार
कॉमेडियन कुणाल कामरा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यापासून तो अडचणीत सापडला आहे. अशातच त्याला टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त शोची ऑफर मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करून कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मुंबईत ज्याठिकाणी त्याने हा शो केला होता, तिथल्या स्टुडिओची शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. इतकं सगळं होऊनही कुणालने हार मानलेली नाही. सोशल मीडियावर तो सतत विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. त्याप्रमाणे याप्रकरणी माफी मागणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलंय. हा वाद सुरू असतानाच आता कुणालला ‘बिग बॉस’ या शोची ऑफर मिळाली आहे. परंतु कुणालने ती थेट नाकारली आहे.
यासंदर्भातील एक पोस्ट त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेसेजचा स्क्रीनशॉट पहायला मिळतोय. कास्टिंग डायरेक्टरने कुणालला ‘बिग बॉस’च्या ऑफरविषयी मेसेज केल्याचं त्यात दिसतंय. यामध्ये कास्टिंग डायरेक्टरने लिहिलंय, ‘मी बिग बॉसच्या या सिझनसाठीचं कास्टिंगचं काम पाहतोय. अशातच तुझं नाव समोर आलं. त्यांना कदाचित तुझं व्यक्तीमत्त्व रंजक वाटू शकतं. मला माहितीये की हा शो तुझ्या रडारवर कदाचित नसेल (तू याचा कधी विचार केला नसशील) पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, तुझं खरं टॅलेंट दाखवण्यासाठी आणि प्रचंड प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी हा भन्नाट प्लॅटफॉर्म आहे. तुला काय वाटतं? आपण याबद्दल बोलुयात का?’ या मेसेजच्या खाली कुणालचं एका वाक्यात उत्तरदेखील पहायला मिळतंय. ‘त्यापेक्षा मला मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणं परवडेल’, असं म्हणत त्याने थेट नकार दिला आहे.




कुणालला ही ऑफर ‘बिग बॉस ओटीटी’साठी की ‘बिग बॉस 19’साठी आली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्याच्या या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक कवितेप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी कुणाल कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं. मुंबई पोलिसांनी त्याला तीन वेळा समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु तिनही वेळा कुणाल कामरा त्याकडे दुर्लक्ष केलं. आता त्याच्याविरोधात दाखल केलेले खटले रद्द करण्याची मागणी करत त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.