मोदींच्या ‘मुस्लिम कोटा’ वक्तव्यावर लारा दत्ता म्हणाली, “सर्वांना खुश ठेवणं..”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मुस्लिम कोटा' या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यावर आता अभिनेत्री लारा दत्ताने प्रतिक्रिया दिली आहे. "प्रत्येकाला प्रत्येक वेळी खुश ठेवता येत नाही", असं तिने म्हटलंय. अभिनेता जिमी शेरगिलनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसने धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या भाषणात केला. तसंच त्या पक्षाने काही ठरावीक लोकांना वाटण्यासाठी जनतेची संपत्ती ताब्यात घेण्याचं व्यापक षडयंत्र रचल्याचा पुनरुच्चार केला. संपत्तीच्या फेरवाटपाचा मुद्दा पंतप्रधानानंनी पुन्हा उपस्थित करत काँग्रेस संपत्ती हिरावून काही ठरावीक लोकांना देईल असा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चा सुरू असताना अभिनेत्री लारा दत्ताने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या दृढ निश्चयावर कायम राहिल्याबद्दल लाराने मोदींचं कौतुक केलं.
काय म्हणाली लारा?
राजस्थानच्या रॅलीमधील मोदींच्या भाषणाबद्दल प्रश्न विचारला असता लारा म्हणाली, “दिवसाअखेर आपण सर्वजण माणूस आहोत. प्रत्येकाला प्रत्येकवेळी खुश ठेवणं खूप कठीण असतं. जर आम्ही सेलिब्रिटी ट्रोलिंगपासून वाचू शकत नाही तर देशाचे पंतप्रधानसुद्धा त्याला अपवाद नाहीत. आम्ही आमच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करतो. या किंवा त्या बाजूला दुखवायचं नाही म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी मोजून-मापून बोलू किंवा वागू शकत नाही. अखेर तुमचं जे सत्य आहे किंवा तुमचा जो विश्वास आहे त्याच्याशी तुम्हाला प्रामाणिक राहावं लागतं. जर असं करण्याचं चातुर्य त्यांच्यात असेल तर मी त्यांचं कौतुक करते. अखेर तुम्हाला तुमच्या विश्वासांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहावंच लागेल.”
मोदी काय म्हणाले होते?
निवडणुकीच्या रॅलीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आधी जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा ते म्हणाले की देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला अधिकार आहे. याचा अर्थ असा की ते ही संपत्ती ज्यांना जास्त मुलं आहेत आणि घुसखोरांना वाटून देतील. तुमच्या कष्टाचे पैसे घुसखोरांना द्यावेत का? तुम्हाला हे मान्य आहे का?’ यावेळी त्यांनी 2006 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. “अल्पसंख्याकांना, विशेषकरून मुस्लिम अल्पसंख्याकांना विकासात समानतेने वाटा मिळावा यासाठी आम्हाला नाविन्यपूर्ण योजना आखाव्या लागतील. त्यांचा संसाधनांवर पहिला हक्क असला पाहिजे”, असं माजी पंतप्रधान म्हणाले होते.
या मुलाखतीत लारा दत्तासोबत अभिनेता जिमी शेरगीलसुद्धा होता. तो म्हणाला, “जर तुमचा जन्म या देशात झाला असेल तर तुमचा जन्म हा त्याच देशभक्तीने झाला असेल. जर असं नसेल तर मग तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.” लारा दत्ता आणि जिमी शेरगिल हे दोघं ‘रणनिती: बालाकोट अँड बियाँड’ या शोमध्ये एकत्र काम करत आहेत.