तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सहाना (Sahana) हिचा वाढदिवशीच मृत्यू झाला. 13 मे रोजी केरळमधल्या (Keral) कोझिकोड जिल्ह्यातील परम्बिल बाजार याठिकाणी राहत्या घरी तिचा मृतदेह आढळला. खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत सहानाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून सहानाचा पती सज्जाद याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सहानाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे. 12 मे रोजी सहानाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “माझी मुलगी आत्महत्या (Suicide) करूच शकत नाही. तिची हत्या झाली आहे. तिचा पती तिला मारहाण करत असल्याची तक्रार ती माझ्याकडे नेहमी करायची. तिचा खूप छळ केला गेलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा”, अशी मागणी सहानाच्या आईने केली.
सहानाचा पती बेरोजगार असल्याने पैशांवरून त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची, अशी माहिती पोलिसांनी दिली. “मदतीसाठी सज्जाद ओेरडला तेव्हा मी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घराचं दार उघडलं तेव्हा त्याची पत्नी मला त्याच्या मांडीवर पडलेली दिसली. नेमकं काय झालं असा प्रश्न विचारला असता सज्जादने सांगितलं की पत्नी काहीच हालचाल करत नाहीये. तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं आणि आम्ही पोलिसांना फोन केला”, असं सहानाचा घरमालक म्हणाला. सहानाच्या आईवडिलांनी तिचा पती सज्जादवर शारीरिक आणि भावनिक छळाचा आरोप केला आहे. सज्जाद आणि सहानाने जवळपास दीड वर्षापूर्वीच लग्न केलं.
सहानाने अनेक दागिन्यांच्या जाहिरातींमध्ये काम केलंय. मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षक जॉली बास्टियन दिग्दर्शित ‘लॉक डाउन’ चित्रपटातही तिने काम केलं. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. पती-पत्नीमध्ये वारंवार होणारे वाद, मारहाण याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार आणि हत्येची शक्यता आहे का, याचा तपास करत आहेत.