राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लीन चोप्राने बनवले अश्लील व्हिडीओ; चार्जशीट दाखल
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शूट केले अश्लील व्हिडीओ; राज कुंद्रा, शर्लीन चोप्रा, पूनम पांडेवर आरोप
मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. महाराष्ट्राच्या सायबर पोलिसांनी राज कुंद्रा, मॉडेल शर्लीन चोप्रा, पूनम पांडे आणि चित्रपट निर्माता मीता झुनझुनवाला यांच्यावर अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप केला आहे.
एकमेकांशी संगनमत करून मुंबई उपनगरातील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये हे अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आले, असं आरोपपत्रात म्हटलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर आर्थिक फायद्यासाठी चौघांनी ते व्हिडीओ विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर वितरित केल्याचा आरोपही पोलिसांनी केला.
या आरोपपत्रात प्राइम ओटीटीचे सुवाजीत चौधरी आणि राज कुंद्राचा कर्मचारी उमेश कामथ यांचंही नाव लंडनमधल्या ‘हॉटशॉट’ या कंपनीचे प्रबंधक म्हणून असल्याचं म्हटलंय. याआधी 2021 मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने एप्रिल महिन्यात वेगळा चार्जशीट दाखल केला होता.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली होती. मी निर्दोष असून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा त्याने केला होता.
राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी छापेमारी केली होती. त्याच्या ऑफिसमधून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये 68 अश्लील व्हिडीओ आढळले होते.