बिग बॉस मराठीचं चौथ पर्व (Bigg Boss Marathi 4) प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे कळताच सगळ्यांनाच उत्सुकता होती हे जाणून घेण्याची की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोण असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रसंचालक कोण असणार? त्या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळालं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे, मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका विशेष प्रोमोमधून (BBM 4 Promo) महेश मांजरेकरच या पर्वाचं सूत्रसंचालन करणार असल्याचं वाहिनीने जाहीर केलं.
‘बिग बॉस मराठीचा सिझन नवा, घर नवे, खेळाडूदेखील नवे… पण होस्ट मात्र तोच, महेश वामन मांजरेकर! लवकरच येणार नव्या कोऱ्या पर्वासोबत तुमच्या भेटीला’ असा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या तीनही पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी आता चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मागील पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने महेश मांजरेकर यांनी प्रेक्षक आणि सदस्यांची मनं जिंकली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ते सांगताना दिसले, “बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये मी घेणार आहे वेगळी शाळा!” आता नक्की काय घडणार, कशी घेणार महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
बिग बॉस आदेश देत आहेत, हे वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचंही लक्ष त्या आवाजाच्या दिशेनं वळतं आणि आता काय घडणार याची उत्सुकता लागते. हे सर्व आता पुन्हा एकदा घडणार आहे. या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. या सदस्यांना कधी प्रेमाने समजावणं तर कधी आपला धाकही निर्माण करण्याचं काम सूत्रसंचालक शनिवार आणि रविवारच्या भागात करत असतो. ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत. या घरात किती सदस्य असतील, कोण कोण असतील, त्यांच्यामध्ये काय काय घडेल या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.