‘बिग बॉस मराठी 5’ सोडण्याविषयी स्पष्टच बोलले महेश मांजरेकर; म्हणाले “रितेशला पहिल्याच सिझनसाठी..”
हिंदीत सलमानला जितकी लोकप्रियता मिळाली, तितकीच मराठी महेश मांजरेकर यांना ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे रितेश देशमुखसमोर प्रेक्षकांची मनं जिकण्याचं मोठं आव्हान आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. यंदाच्या सिझनची घोषणा जेव्हा झाली, तेव्हाच प्रेक्षकांना सरप्राइज मिळालं होतं. हे सरप्राइज म्हणजे अभिनेता रितेश देशमुखची एण्ट्री. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचं सूत्रसंचालन रितेश करत आहे. त्याआधी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर हे बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करत होते. ‘बिग बॉस मराठी 5’चा नवीन प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. महेश मांजरेकर नाहीत, हे जाणून काहींनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मांजरेकरांनी बिग बॉस सोडण्यामागचं कारण सांगितलं. त्याचप्रमाणे रितेशच्या सूत्रसंचालनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले महेश मांजरेकर?
अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, “मी जेव्हा बिग बॉस मराठीच्या सूत्रसंचालनाला सुरुवात केली होती, तेव्हा माझा फक्त वर्षभराचाच करार होता. त्याआधी मी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं. पण जेव्हा करार केला, तेव्हा शोचे काही एपिसोड्स पाहिले आणि हा गेम भारी आहे, असं वाटलं. सूत्रसंचालनाला सुरुवात केली आणि असे एकाचे चार सिझन्स झाले. पण पाचव्या सिझनच्या वेळी त्यांना खरंच असं वाटलं असेल की मी जरा रिपिटेटिव्ह होतोय. त्यांना जे अपेक्षित असेल ते कदाचित माझ्याकडून येत नसेल.”
View this post on Instagram
यावेळी रितेशबद्दल ते पुढे म्हणाले, “जेव्हा पहिल्यांदा माझी निवड झाली, तेव्हा मला असं वाटलं होतं की, अरे मीच का? इतरही स्टार आहेतच की. पण आता जेव्हा रितेश देशमुखचं नाव ऐकलं तेव्हा वाटलं की अरे वाह! नशिब त्यांनी रितेशला पहिल्याच सिझनसाठी घेतलं नाही, नाहीतर मी तो शो कधीच केला नसता (हसतात). तसंही चार वर्षे मी तो शो खूप एंजॉय केला होता. बदल करणं हे त्यांच्या हातात होतं. पण हा सिझन मला तितक्याच आवडीने पाहता येईल. मी जे काम केलं, त्याचं मला खूप समाधान आहे. लोकांनाही बदल हवा असतो. रितेशसाठी मी खूप सकारात्मक आहे. तो हा शो गाजवेल असा मला विश्वास आहे.”