‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचं लक्ष वेधत यशस्वी ठरलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘बबन’ हा चित्रपटही सुपरहिट ठरला. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे म्हणून भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत ओळखलं जातं. ‘हैद्राबाद कस्टडी’ हा त्यांचा सिनेमाही 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांचे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असले तरी भाऊराव आता एका वेगळ्या धाटणीचा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. विशेष म्हणजे कॉमेडी (Comedy) जॉनर घेऊन ते पहिल्यांदाच दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील करणार आहेत. ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत तर भाऊराव कऱ्हाडे निर्मित ‘टीडीएम’ (TDM) या आगळ्यावेगळ्या नावाच्या सिनेमातून भाऊराव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
चित्रपटाचे पोस्टर पाहता पाठमोरा व्यक्ती नेमका कोण आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. शिवाय पोस्टरवरील गावाकडील रम्य सकाळ पाहता चित्रपटाचे कथानक नेमके काय असेल, याची उत्सुकता अधिकच ताणली जात आहे. विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या कथेला आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला भाऊराव प्रेक्षकांसमोर कसे मांडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा हा ‘टीडीएम’ हा आगामी कॉमेडी जॉनरचा सिनेमा रसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. आणि पोस्टरवरील पाठमोरा कलाकार नेमका कोण आहे, याने तर प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
याबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे असे म्हणाले की, “एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्हीची धुरा मी या कॉमेडी जॉनरच्या ‘टीडीएम’ चित्रपटात पेलवली आहे. वेगळाच जॉनर पहिल्यांदा करत असल्याने मी ही या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे.”
‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. टीडीएम या नावातच वेगळं काहीतरी असणाऱ्या आणि हास्याची मेजवानी घेऊन येणाऱ्या या सिनेमाची रंगत भाऊरावांनी कुठवर नेऊन ठेवलीय हे लवकरच प्रेक्षकांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.