काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या मनावरही छाप पाडण्यात यशस्वी होतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘दे धक्का’. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आणि आता या चित्रपटाचा सीक्वेल ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) येत्या 5 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तर या चित्रपटाच्या टीझरला अल्पावधीत दोन दशलक्ष व्ह्यूज मिळाले. ‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं होतं. मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम (Shivaji Satam), मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका आगळ्यावेगळ्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.
आता ‘दे धक्का 2’मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कारने घेतली आहे आणि चित्रपटाचं कथानक लंडनमध्ये घडतंय. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, संजय खापरे तसंच सहकलाकार गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत. ‘दे धक्का 2’चं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे तर संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केलं आहे. करण रावत हे सिनेमॅटोग्राफर आहेत तसंच चित्रपटाचं एडिटिंग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केलं आहे.
‘दे धक्का 2’मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत. आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे. सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ ने प्रदर्शित केले आहेत. ‘दे धक्का 2’ ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ पटेल यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते कर्मिका टंडन आणि विशिष्टा दुसेजा हे आहेत .