सिनेसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (Gajendra Ahire) पुन्हा एकदा एक अनोखा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. गुवाहाटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ने सन्मानित करण्यात आलेला ‘डियर मॅाली’ (Dear Molly) हा चित्रपट येत्या 1 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून हा एक नातेसंबंधावर भाष्य करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वडील आणि मुलीच्या (Father & Daughter) नात्यातील अव्यक्त प्रेम यात पाहायला मिळत आहे.
ट्रेलरमध्ये आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी सातासमुद्रापार पोहोचलेली मॅाली दिसत आहे. जिचा खूप धडपडीचा प्रवास सुरू आहे. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपल्या माणसांना पाठीशी ठेवून परदेशी निघून गेलेल्या बाबांना शोधण्यात मॅाली यशस्वी होणार का? तिला दिलेल्या पत्रांमध्ये तिच्या मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? अशी अनेक रहस्यांचा उलगडा 1 जुलैला होणार आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणतात, “ही कहाणी आहे नवरा – बायकोची. ही कहाणी आहे वडील -मुलीच्या नात्याची. ही एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा मला हवी होती तशीच आहे. विशेष कौतुक आलोक आणि मृण्मयीचे कारण त्यांच्या वयापेक्षा जास्त वयाची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. या भूमिकेला त्यांनी शंभर टक्के न्याय दिला आहे. या चित्रपटातील गाणीही परिस्थितीला साजेसी अशीच आहेत. या चितेरपटाचे चित्रीकरण हे स्विडनमध्ये झाले आहे. त्यामुळे या चित्रपटात स्विडीश संस्कृतीही डोकावते. या चित्रपटासाठी हव्या असलेल्या सर्व गोष्टी मला मिळाल्या, मात्र त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमला बरीच मेहनत करावी लागली. या सगळ्यात निर्मात्यांचे सहकार्य खूप लाभले.” निश्चल प्रॉड्क्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रवीण निश्चल व व्हिनस यांनी केली आहे.