‘मातोश्री’वरील बाळासाहेब-आनंद दिघेंची ‘गुरुपौर्णिमा’; ‘धर्मवीर’च्या गाण्याने 20 तासांत पार केला 20 लाख व्ह्यूजचा टप्पा
आपल्या हयातीत या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या इहलोकी गेल्यानंतरही कायम आहे. या प्रेमाची प्रचिती आपल्याला वारंवार येतच असते. याहीवेळी ती आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलं आहे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer) हा चित्रपट.
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी ‘मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे’ या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही कीर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते! असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) ही गुरू शिष्याची जोडी. आपल्या हयातीत या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या इहलोकी गेल्यानंतरही कायम आहे. या प्रेमाची प्रचिती आपल्याला वारंवार येतच असते. याहीवेळी ती आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलं आहे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट.
ठाण्याचा ढाण्या वाघ असलेले जननायक धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर सत्तर लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. नुकतंच या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आणि केवळ 20 तासांमध्ये या गाण्याला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी हे गाणं आपापल्या पेजवरून शेअरही केलं आहे. युट्यूबवरसुद्धा हे गाणं नंबर 1 ला ट्रेडिंगमध्ये आहे हे विशेष.
पहा गाणं-
धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी गुरू, मार्गदर्शक, तत्त्वेता एवढंच नाही तर त्यांच्या गाभाऱ्यातील देवाच्या स्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे दिघे यांच्यासाठी अखेरचा शब्द. अशा या गुरुची पाद्यपूजा करत या नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आलाय. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर यांच्यातील नात्याचा हा अनोखा प्रसंग बघताना अनेकजण भावूक झाले. जसं हे गुरू शिष्याचं नातं सर्वश्रुत आहे तसाच निर्मळ आणि निरपेक्ष भाव आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या गुरू-शिष्याच्या नात्यात. याही नात्याची एक झलक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळाली. या गाण्यामुळे आता चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. येत्या 13 मे झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.