पहिलं गाणं रेकॉर्ड झालं अन् प्रल्हाद शिंदेंना सोन्याची अंगठी दिली; मधुकर घुसळेंचं ‘ते’ लोकप्रिय गाणं कोणतं?
'कारभारी दमानं...' 'डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया...' या गाण्याचे प्रसिद्ध गीतकार मधुकर घुसळे यांच्या पहिल्या गाण्याचा किस्साही अजब आहे. (how madhukar ghusle record his first song?, read)
मुंबई: ‘कारभारी दमानं…’ ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ या गाण्याचे प्रसिद्ध गीतकार मधुकर घुसळे यांच्या पहिल्या गाण्याचा किस्साही अजब आहे. आपल्या पहिल्या गाण्यासाठी त्यांनी थेट स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांना बोटातील अंगठी काढून दिली होती. काय होता हा किस्सा? वाचाच… (how madhukar ghusle record his first song?, read)
प्रल्हाद दादांची अट
मधुकर घुसळे यांनी बरीच गाणी लिहिली होती. त्यांची अनेक गाणी गायिका रंजना शिंदे यांनी गायलीही होती. परंतु घुसळे यांच्या गाण्याची कॅसेट आली नव्हती. एकही गाणं रेकॉर्ड झालं नव्हतं. त्याची त्यांना नेहमीच खंत वाटायची. एक दिवस ते आपली चोपडी घेऊन प्रल्हाद शिंदेंकडे गेले. शिंदेंनी त्यांची चोपडी चेक केली. त्यातील एक गाणं काढलं आणि हे गाणं रेकॉर्ड करण्याचं ठरवलं. परंतु गाणं रेकॉर्ड होण्यासाठी घुसळे उतावीळ झाल्याचं पाहून त्यांनी मस्करीतच एक अट घातली. तुझं गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर तुझ्या हातातील सोन्याची अंगठी मला देशील का? असं शिंदे म्हणाले. त्यावर घुसळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला होकार दिला. अन् दिल्या शब्दाप्रमाणे गाणं रेकॉर्ड झाल्याबरोबर त्यांनी शिंदेंना चक्क बोटातील सोन्याची अंगठी काढूनही दिली.
कोणतं होतं ते गाणं…
आपल्या ज्या गाण्यासाठी घुसळे यांनी शिंदेंना बोटातील अंगठी काढून दिली ते गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. त्याकाळात हे गाणं लग्नात हमखास वाजायचं. आजही हे गाणं हमखास वाजतं. ते गाणं होतं….
एक वरमाय रुसली, ऐन लग्नात हो जीजी…
घुसळे यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या पोहोचलेलं हे गाणं आजही तितकच लोकप्रिय आहे. आजही खेड्यापाड्यात, शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये लग्नाच्यावेळी हे गीत हमखास वाजतं. या गाण्यातील नजाकत, खट्याळपणा, नर्मविनोदासह वास्तव परिस्थितीवरचं भाष्य आजही काळजाला भिडून जातं. माणसाचं जीवनमान बदललं. पण या गाण्यात मानवी स्वभावावर जे बोट ठेवलं आहे, ती परिस्थिती काही बदलली नाही. त्या काळी एक बाहुली चालली उभ्याच वाटेनं… हे गाणं आलं होतं. या गाण्याच्या चालीवर घुसळेंना एक वरमाय रुसली… हे सूचलं आणि हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की मूळ गाणंही लोक विसरून गेले. ते केवळ या गाण्यातील नर्मविनोदीपणामुळेच.
पत्नीचा हर्ष, पाच किलो पेढे वाटले
मधुकर घुसळे यांचं पहिलं गाणं ‘एक वरमाय रुसली…’ हे रेकॉर्ड झालं. त्याची कॅसेट बाजारात आली. एक कॅसेट घुसळे घरी घेऊन आले आणि घरात गाणं वाजवलं. घुसळेंचं पहिलं गाणं रेकॉर्ड झाल्याने त्यांची पत्नी मालतीबाई प्रचंड आनंदी झाल्या. त्यांनी चक्क चाळीत पाच किलो पेढे वाटून हा आनंद साजरा केला. हा किस्सा सांगताना घुसळे पोट धरून हसले होते.
राहणीमान टकाटक
घुसळे यांची राहणीमान एखाद्या ऑफिसर सारखी होती. गीतकार असल्यामुळे झब्बा, कुर्ता, गळ्यात शबनम असा पेहराव त्यांनी कधीच केला नाही. ते रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे ते नेहमीच कडक इस्त्रीची सफारी अन् पायात बूट असा त्यांचा पेहराव होता. ते नेहमीच सफारी घालायचे. त्यांना सफारी शोभूनही दिसायची. मध्यम बांधा, सावळा वर्ण आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य अशी त्यांची छबी अनेकांना मोहून टाकत असे. (साभार, आंबेडकरी कलावंत) (how madhukar ghusle record his first song?, read)
संबंधित बातम्या:
गर्दीनं डोकं फिरलं अन् ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ सूचलं; वाचा अफलातून किस्सा!
‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं’चा कारभारी कोण माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा
टिनपाटच्या डब्यावर ताल शिकले, इराण्याच्या हॉटेलबाहेर गाणं; असे घडले विठ्ठल शिंदे!