Marathi Movie : सम्या आणि रेणूची मनाला भिडणारी प्रेमकहाणी ‘समरेणू’, 13 मेपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला…
‘समरेणू’तील सम्या, रेणू व संत्या यांचे चेहरे काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच 'समरेणू' चित्रपटातील शीर्षकगीताला देखील प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मुंबई : ‘समरेणू’तील (Samrenu) सम्या, रेणू व संत्या यांचे चेहरे काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच ‘समरेणू’ चित्रपटातील शीर्षकगीताला देखील प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून टिझरच्या माध्यामातून आपल्याला सम्या आणि रेणूची एकमेकांमध्ये आकंठ बुडालेली प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. येत्या 13 मे रोजी ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात महेश डोंगरे (Mahesh Dongare), रुचिता मांगडे (Ruchita Mangade), भारत लिमन (Bharat Liman) हे मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन महेश डोंगरे यांनी केले आहे.
टिझरमध्ये एका ठिकाणी सम्या आणि रेणूची हळूहळू बहरत जाणारी प्रेमकहाणी दिसत आहे तर सोबत बदल्याची आग मनात भरलेला संत्याही दिसत आहे. या दोघांमध्ये मनाची घालमेल होत असलेल्या रेणूचे आयुष्य एक वेगळ्याच वळणावर आलेले दिसत आहे. हे वळण नक्की कोणते असेल, यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
‘समरेणू’चे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, ” ‘समरेणू’ चित्रपट माझा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे माझ्यासोबत संपूर्ण टीमला या चित्रपटाची नक्कीच उत्सुकता आहे. सम्या आणि रेणू यांच्या प्रेमकहाणीत वेगळाच ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटातील संगीत टीम खूप अनुभवी आणि कसलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटासोबतच गाणी सुद्धा आवडतील.”
एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.
संबंधित बातम्या