अशोक सराफ दिसणार डॉक्टरच्या भूमिकेत; ‘लाईफलाईन’ सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण
Actor Ashok Saraf New Movie Lifeline Poster : अशोक सराफ दिसणार प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत... राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत 'लाईफलाईन' मधील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचं अनावरण झालं आहे. या सिनेमाविषयी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे. वाचा सविस्तर.....

जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित ‘लाईफलाईन’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. प्रदर्शित झालेले चित्रपटाचे पोस्टर बघून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दिग्गजांमधील संघर्षमय जुगलबंदी पाहाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंबईत साजऱ्या करण्यात आलेल्या ‘डॉक्टर्स डे सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.
सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण
‘लाईफलाईन’ चित्रपटाच्या पोस्टर अनावरण कार्यक्रमावेळी देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. अशोक सराफ यांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला. या कार्यक्रमात अशोक सराफ आणि डॉक्टर अशी ‘फॅन मुमेंट’ही पाहायला मिळाली. यावेळी डॉक्टरांच्या परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे काय महत्व आहे, हे सुद्धा त्यांनी यावेळी विशद केले. तसेच ‘लाईफलाईन’ चित्रपट पाहाण्याचे आवाहनही अशोक सराफ यांनी केले.
अशोक सराफ काय म्हणाले?
‘लाईफलाईन’ सिनेमातील भूमिकेविषयी अभिनेते अशोक सराफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज या प्रख्यात डॉक्टरांसोबत हा दिवस साजरा करता आला, हे मी माझे सौभाग्य मानतो. माझ्या आगामी चित्रपटामुळे मला हा क्षण अनुभवता आला. ‘लाईफलाईन’ या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा या खास दिनानिमित्ताने समोर आली असून मी यात एका डॅाक्टरची व्यक्तिरेखा साकारत आहे. मुळात या क्षेत्राबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि या चित्रपटामुळे हा आदर अधिकच वाढला आहे, असं अशोक सराफ म्हणाले.
‘लाईफलाईन’ सिनेमातील ही भूमिका साकारताना मला डॅाक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता, त्यांना करावा लागणारा विविध गोष्टींचा सामना, विरोध या सगळ्या गोष्टी मला या व्यक्तिरेखेमुळे अनुभवता आल्या. प्रत्येक गोष्टीमागे काही विज्ञान असते, हे रीतिरिवाजांमध्ये गुरफ़टलेल्यांना पटवून देणे किती जिकिरीचे काम आहे, हे मला या चित्रपटातून समजले, असं अशोक सराफ यांनी म्हटलं आहे.