टॅक्सी चालक ते अभिनेता, ‘त्या’ सिनेमाने नऊ वर्षाचा संघर्ष संपवला; कसा होता रवींद्र महाजनी यांचा प्रवास
रवींद्र महाजनी यांनी पहिली संधी मिळाली ती मधुसूदन कालेलकर यांच्याकडून. कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकात महाजनी यांना काम मिळालं आणि त्यांची भूमिकाही गाजली.
पुणे : आपल्या देखण्या आणि रुबाबदार व्यक्तीमत्त्वाने मराठी सिनेसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील अंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. महाजनी यांच्या मृत्यूमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक काळ गाजवणाऱ्या आणि एका चांगल्या नटाला गमावल्याची भावना मराठी सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.
रवींद्र महाजनी यांना दम्याचा त्रास होता. ते आंबी गावातील या फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते या फ्लॅटमध्ये एकटेच भाड्याने राहत होते. शुक्रवारी रात्री त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने सोसायटीतील लोकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर दरवाजा उघडून आत गेल्यावर महाजनी यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. त्यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदनानंतर याबाबतची पृष्टी होणार आहे.
वडिलांचा सल्ला
रवींद्र महाजनी यांचा जन्म कर्नाटकातील बेळगावी झाला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी हे त्यांचे वडील होते. रवींद्र महाजनी यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. ते शाळा आणि महाविद्यालयातही नाटक, एकांकीकेत काम करायचे. इंटर सायन्सला नापास झाल्याने महाजनी निराश झाले होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांनी बीए करण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या सल्ल्यानुसार रवींद्र महाजनी यांनी खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच त्यांची भेट रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर, अशोक मेहता आदी मंडळींशी झाली आणि त्यांच्याशी मैत्रीही जमली.
मित्रांनी ठरवलं…
शिक्षण सुरू असतानाच या मित्रांनी भविष्यात काय करणार हे ठरवून टाकलं होतं. शेखर कपूर यांनी दिग्दर्शन करण्याचं ठरवलं होतं. रमेश तलवार, अवतार गिल आणि रवींद्र महाजनी यांनी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं. तर रॉबिन भट्ट यांनी लेखन करण्याचं ठरवलं होतं. तर अशोक मेहता यांनी कॅमेरामन होण्याचं ठरवलं होतं. विशेष म्हणजे हे सर्व मित्र पुढे आपल्या आवडत्या क्षेत्रातच स्थिर स्थावर झाले.
टॅक्सी चालवली
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनेमा क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी रवींद्र महाजनी यांनी प्रचंड प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी महाजनी यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी छोटीमोठी कामे करण्यास सुरुवात करतानाच टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. महाजनी यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केल्याने त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकावे लागले. संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून त्यांची अवहेलना झाली. पण गरजेसमोर पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी हे टोमणेही सहन केले.
पहिली संधी
रवींद्र महाजनी यांनी पहिली संधी मिळाली ती मधुसूदन कालेलकर यांच्याकडून. कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकात महाजनी यांना काम मिळालं आणि त्यांची भूमिकाही गाजली. नंतर कालेलकरांनी त्यांच्यासाठी तो राजहंस एक हे नाटक लिहिलं. शांताराम बापूंनी हे नाटक पाहिलं आणि त्यांनी थेट महाजनी यांनी झुंज या सिनेमात काम दिलं. 1974 साली आलेला हा सिनेमा प्रचंड गाजला. तो इतका की रवींद्र महाजनी नवा स्टार म्हणून उदयास आले. झुंजने त्यांच्या नऊ वर्षाचा संघर्षही संपवला. या सिनेमाने रौप्यमहोत्सवी यश साजरे केले.
सिनेमांची रांग लागली
त्यानंतर रवींद्र महाजनी यांच्याकडे सिनेमाच्या प्रचंड ऑफर आल्या. आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ, देवता, मुंबईचा फौजदार आदी सिनेमात त्यांनी काम केलं. अगदी अलिकडे म्हणजे 2015मध्ये नंतर त्यांनी कॅरी ऑन मराठा, काय राव तुम्ही, देऊळबंद आणि पानीपत आदी सिनेमात काम केलं. सत्तेसाठी काहीही या सिनेमातून त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं.