अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकच्या (Prasad Oak) करिअरमधील सुवर्णकाळ सध्या सुरू आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एकीकडे त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता त्याची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करतोय. प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चारशेहून अधिक थिएटर्समध्ये ‘धर्मवीर’चे 10 हजारांहून अधिक शोज लावले गेले. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटला दुग्धाभिषेक केला तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहोचले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.05 कोटी रुपयांचा गल्ला (box office collection) जमवला. तर गेल्या तीन दिवसांत ‘धर्मवीर’ने 9.59 कोटी रुपये कमावल्याचं कळतंय. महाराष्ट्रात अजूनही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.
वीकेंडलाही ‘धर्मवीर’ची चांगली कमाई झाली. रविवारी या चित्रपटाने 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली, तर अभिनेता क्षितिज दाते हा एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत आहे. रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी या कलाकारांच्या लूकवर विशेष मेहनत घेतली.
या चित्रपटाचा पहिला पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचं प्रमोशनही अगदी जोरदार करण्यात आलं. प्रमोशन आणि माऊथ पब्लिसिटीचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसतोय.