Rinku Rajguru: होय, तुम्ही ज्या आर्चीला ओळखता ही तीच आहे पण..
या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या गाण्यातील रिंकूचा लूक पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. या चित्रपटात रिंकू ॲसिड हल्ला पीडित (acid attack survivor) तरुणीची भूमिका साकारतेय.
‘सैराट’ या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारून सबंध महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सध्या तिच्या एका चित्रपटातील भूमिकेमुळे आणि लूकमुळे चर्चेत आली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील आर्चीच्या खास अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतरही रिंकू विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मध्यंतरीच्या काळात तिने वजन कमी करत तिच्या लूकवर विशेष मेहनत घेतली. आता रिंकू ‘आठवा रंग प्रेमाचा’ (Rinku Rajguru) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतली आहे. या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या गाण्यातील रिंकूचा लूक पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. या चित्रपटात रिंकू ॲसिड हल्ला पीडित (acid attack survivor) तरुणीची भूमिका साकारतेय. त्यामुळे तिचा लूकही तसा करण्यात आला आहे.
काळ कितीही आधुनिक झाला तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. 17 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रिंकू राजगुरूनं ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. लव्ह स्टोरी, ड्रामा, गूढ यांचं मिश्रण प्रेक्षकांना या चित्रपटात पहायला मिळणार आहे. रिंकूने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही अत्यंत वेगळी भूमिका आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
भूमिकेविषयी काय म्हणाली रिंकू?
“ॲसिड हल्ला पीडित मुलीची भूमिका साकारणं अजिबात सोपं नव्हतं. हृदय पिळवटून टाकणारी ही भूमिका आहे. ते कोणत्या दु:खातून आणि त्रासातून जातात, त्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. प्रत्येक मुलीला नटायला-थटायल, सुंदर दिसायला खूप आवडतं. मात्र एका धक्कादायक घटनेनंतर तिला आयुष्यभर तो त्रास सहन करावा लागतो”, असं ती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. या चित्रपटात रिंकूसोबतच ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांची भूमिका आहे. तर विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे. खुशबू सिन्हा यांनी दिग्दर्शकीय पदार्पणातच वेगळ्या धाटणीचा चित्रपट केला आहे.