Samrenu Marathi Movie : ‘समरेणू’चे शीर्षकगीत प्रदर्शित, प्रेमात पाडणारं शीर्षकगीत
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते 'समरेणू' चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
मुंबई : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांच्या हस्ते ‘समरेणू’ (Samrenu Marathi Movie) चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शीर्षकगीतात सम्या (Samya) आणि रेणूची (Renu) निखळ प्रेमकहाणी अनुभवायला मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात प्रेम अधिकच खुलून येते, हे या गाण्यातून दिसून येत आहे. एका निसर्गरम्य गावात या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. ‘समरेणू’चे दिग्दर्शक लेखक महेश डोंगरे (Mahesh Dongre) म्हणतात, “हे गाणे सम्या आणि रेणू यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून सम्या आणि रेणूचे घनिष्ठ नाते दिसत आहे. मात्र शेवटी हे नाते कोणत्या वळणावर जाते, हे चित्रपटात दिसणार आहे.”
‘समरेणू’ हे शीर्षकगीत सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायले आहे. या प्रेमगीताला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सूरज- धीरज यांचे संगीत लाभले आहे. ‘समरेणू’ ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.
‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी टॅगलाईन असल्येला या पोस्टरमध्ये सम्या आणि रेणू दिसत असून त्यांचा नात्याचा शेवट कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले असून या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूची ही प्रेमकहाणी आहे. येत्या 13 मे रोजी चित्रपटगृहात ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.
संबंधित बातम्या