मराठी इंडस्ट्रीतील (Marathi Industry) दिग्गज कलाकारांपैकी एक असलेले अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांनी नुकतेच फेसबुकवर मुलीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी ही वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाली आहे. मुंबई विमानतळावरचा तिला पाठवतानाचा फोटो त्यांनी फेसबुक (Facebook) स्टोरीमध्ये पोस्ट केला. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं कॅप्शन देत त्यांनी फोटो पोस्ट केला आहे. शरद पोंक्षे यांना स्नेह हा मुलगा तर सिद्धी ही मुलगी आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत स्नेहने नुकतंच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. तर सिद्धीची काही वेगळी स्वप्नं आहेत. हीच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती निघाली आहे. यावेळी शरद पोंक्षेंनी तिला भावनिक निरोप दिला.
शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेहने ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या टीममध्ये भाग घेतला होता. त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे. त्या दृष्टीने त्याने आपला प्रवास सुरु केला आहे. तर सिद्धीला वैमानिक व्हायचं आहे. शालेय शिक्षणातही ती हुशार असल्याचं पोंक्षेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. बारावीत तिला विज्ञान शाखेत 87 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळीसुद्धा पोंक्षेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. ‘2019 मध्ये माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. रुग्णालयात येऊन, कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेंशनमध्ये असतानाही पिल्लूनं 87 टक्के मार्क बारावी विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहूबाजूंनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’, असं त्यांनी लिहिलं होतं.
कर्करोगाला मात देण्याच्या प्रवासाबद्दल त्यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे. ‘दुसरं वादळ’ असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात त्यांनी कशापद्धतीने कर्करोगाशी झुंज दिली आणि या प्रवासात त्यांची कोणी कशा पद्धतीने मदत केली याविषयी लिहिलं आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर त्यांनी कलाविश्वात पुन्हा काम सुरू केलं. चित्रपटसृष्टी, मालिका आणि रंगभूमीवरही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविला आहे.