Sher Shivraj: बॉक्स ऑफिसवर ‘शेर शिवराज’ची डरकाळी; पहिल्या 3 दिवसांत कोट्यवधींची कमाई
शिवकालीन इतिहास हा नव्या आणि जुन्या अशा दोन्ही पिढ्यांना आपलासा वाटेल अशा पद्धतीने मांडण्याचं तंत्र दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांना चांगलंच जमलंय. 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शिवकालीन इतिहास हा नव्या आणि जुन्या अशा दोन्ही पिढ्यांना आपलासा वाटेल अशा पद्धतीने मांडण्याचं तंत्र दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांना चांगलंच जमलंय. ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, आणि ‘पावनखिंड’नंतर ‘शिवराज अष्टका’तील हा चौथा चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांकडून आव्हान असतानाही ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) दमदार कामगिरी करत आहे. ‘माऊथ पब्लिसिटी’चा चांगला फायदा या चित्रपटाला होत असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने नमूद केलंय. ‘शेर शिवराज’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 4.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘केजीएफ: चाप्टर 2’ आणि ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांकडून आव्हान असतानाही ‘शेर शिवराज’ने चांगली कमाई (Box Office Collection) केली.
शेर शिवराजची कमाई-
शुक्रवार- 1.05 कोटी रुपये शनिवार- 1.45 कोटी रुपये रविवार- 1.70 कोटी रुपये एकूण- 4.20 कोटी रुपये
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-
Strong word of mouth has come into play and that is converting into footfalls… #Marathi film #SherShivraj withstands opponents [#KGF2, #Jersey], goes from strength to strength with each passing day in #Maharashtra… Fri 1.05 cr, Sat 1.45 cr, Sun 1.70 cr. Total: ₹ 4.20 cr. pic.twitter.com/4Asf7Yo374
— taran adarsh (@taran_adarsh) April 25, 2022
अफझल खानाच्या वधाची गोष्ट अनेकांना माहीत आहे. मात्र या कथेतील छोट्या-छोट्या प्रसंगातून मांडणीत ताजेपणा, नवेपणा ठेवण्याचा प्रयत्न दिग्पालने केला आहे. एकाहून अधिक भागांत चित्रपटांची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणताना अनेकदा त्या त्या व्यक्तिरेखा आणि त्यातील कलाकारांचे ठरलेले चेहरे यांच्यातील तोचतोचपणा जाणवण्याचा धोका असतो. मात्र शेर शिवराज साकारताना दिग्पालने या गोष्टींचा खूप बारकाईने विचार केलेला जाणवतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि जिजाऊंच्या भूमिकेतील मृणाल कुलकर्णी वगळता बाकी सगळ्या व्यक्तिरेखा आणि कलाकारांच्या चेहऱ्यात अदलाबदल करण्यात आली आहे. यात बहिर्जी नाईकांची भूमिका दिग्पाल यांनी स्वत:कडे घेतली आहे.
नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखं रोवून पोट फाडून त्याचा वध केला होता. याच कथेचा संदर्भ देत ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची सुरुवात होते. अफजल खान किती क्रूर होता याचं चित्रण करणाऱ्या घडामोडी दाखवत असतानाच दुसरीकडे महाराजांशी एकनिष्ठ असलेले मावळे किती शौर्यवान होते, जिजाऊंची महाराजांना असलेली खंबीर साथ याचंही चित्रण समर्पकरित्या करण्यात आलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, रणनिती, आयुर्वेदाचा अभ्यास, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.