व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीला नेटकऱ्यांनी झापलं; ट्रोल होताच उचललं ‘हे’ पाऊल
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केलं. मात्र या ट्विटमध्ये तिने प्रमाण भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांना विनाकारण टोमणे लगावले आहेत. त्यामुळे तिच्यावर सडकून टीका होत आहे.
कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी राजभाषा दिवस’ (Marathi Bhasha Din) साजरा केला जातो. या दिनानिमित्त सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी शुभेच्छांचा संदेश लिहिला. मराठी कलाविश्वातील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिनेसुद्धा मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलं. मात्र या ट्विटमध्ये तिने प्रमाण भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांना विनाकारण टोमणे लगावले आहेत. ‘मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्च्या’, असं उपरोधिक ट्विट तिने केलं आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. विशेष म्हणजे इतरांच्या व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीच्या या ट्विटमध्येच चूक असल्याचंही नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं. (Marathi Actress)
काय आहे सोनालीचं ट्विट? न आणि ण श आणि ष, ळ आणि ड, चांदणीमधील च आणि चंद्रामधील च, जहाजामधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणार्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्च्या!!!
या ट्विटमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर अखेर सोनालीने ते ट्विट डिलिट केलं. मात्र तिच्या ट्विटचे स्क्रीनशॉट्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यावरून अजूनही तिच्यावर टीका केली जात आहे. सोनालीने विनाकारण अशी खिल्ली उडवू नये, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं. तर इतरांच्या व्याकरणाच्या चुका काढताना सोनालीने स्वत:च्याच ट्विटमध्ये ‘कळणार्यांना’ असा चुकीचा शब्द लिहिला असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.