कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (land scam case) ईडीकडून रविवारी सकाळपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी प्रतिक्रिया म्हटलं, “माझ्याविरोधात चुकीचा गुन्हा लावण्यात आला आहे. ईडी मला अटक करणार आहे आणि मी अटक व्हायला जाणार आहे.” ईडीच्या या कारवाईबाबत अनेकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अशातच अभिनेता आरोह वेलणकरने (Aroh Welankar) सूचक ट्विट केलं आहे. आरोहने कोणाचंही नाव न घेतला भ्रष्टाचार केला का नाही यावर बोला, असं म्हटलंय.
‘बाकी सगळं सोडा हो, पैसे खाल्ले का नाही यावर बोला, भ्रष्टाचार केला का नाही यावर बोला.. काय?,’ असं ट्विट आरोहने केलं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि इतर राजकीय, सामाजिक घडामोडींवर आरोह ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होताना दिसतो. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींबाबत त्याने बऱ्याचदा ट्विट केलं होतं. विविध विषयांवर सोशल मीडियावर मोकळेपणे व्यक्त होणाऱ्या मराठी कलाकारांमध्ये आरोहचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या पोस्टद्वारे तो कधी सडेतोड तर कधी उपरोधिक टोला लगावतो. असंच सूचक ट्विट त्याने आजच्या घडामोडींबाबत केलं आहे.
बाकी सगळं सोडा हो, पैसे खाल्ले का नाही ह्यावर बोला, भ्रष्टाचार केला का नाही ह्यावर बोला.. काय?
— Aroh Welankar (@ArohWelankar) July 31, 2022
“जी काय कारवाई व्हायची ती होऊ द्या मी घाबरत नाही. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांचा बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, देश ओळखतो तो शिवसेनेमुळे आणि हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही. निधड्या छातीने उभा राहतो. कुणी काहीही म्हणू द्या, त्यामुळे या कारवाईला सुद्धा मी निधड्या छातीने सामोरे जातोय. यातूनच महाराष्ट्रालासुद्धा बळ मिळेल. आमच्यासारखी ही काही लोक आहेत जी न झुकता न डरता कारवाईला सामोरे जातात आणि लढाई लढतात आणि या अशा कारवाईंच्या भीतीने अनेक लोक पक्ष सोडून जातात शरणागती पत्करतात. संजय राऊत असा नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” अशी प्रतिक्रिया राऊतांनी ईडीच्या कारवाईवर दिली.