‘छावा वाईट फिल्म’ म्हणणाऱ्या आस्ताद काळेला मेघा धाडेचं उत्तर; म्हणाली..
अभिनेता आस्ताद काळेनं 'छावा' या चित्रपटासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ही फिल्म सर्वतोपरी वाईट आहे, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यावरून नेटकऱ्यांनी आस्तादला प्रचंड ट्रोलदेखील केलं होतं. आता मेघा धाडेनं त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘छावा वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे’, अशी टीका त्याच चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता आस्ताद काळेनं केली होती. याविषयी त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. आता अभिनेत्री मेघा धाडेनं आस्तादच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तुला खात्री नव्हती तर त्यात स्वत:हून का काम केलंस, असा सवाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मेघाने आस्तादला केला आहे.
“आस्तादचं म्हणणं मला पटलं नाही. कोणीतरी इतक्या मोठ्या पातळीवर आपल्या शंभूराजांना, त्यांनी दिलेल्या बलिदानाला सगळ्या जगासमोर आणत आहे, हा विचार तो का करत नाही? आतापर्यंत त्याने केले सर्वच चित्रपट चांगले होते का? जर त्याला चित्रपटाबाबत खात्री नव्हती तर मग त्याने स्वत:हून काम का केलं? त्या चित्रपटाचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. काही गोष्टी या काळाची गरज असतात,” असं मेघा म्हणाली.
“प्रत्येक गोष्ट आपण तांत्रिकरित्या किती योग्य आहे हे बघण्याइतकं टीकात्मक होऊ नये. आज कितीतरी मुलांना शंभूराजांचा इतिहास माहीत नाही. सगळ्यांच्या नशिबात आस्तादच्या बाबांसारखे बाबा नाहीत ना. जे त्याला छान इतिहास समजावून सांगतील. आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांना त्यांच्या आईवडिलांकडून इतका चांगला ठेवा मिळणार नाही. छावासारख्या चित्रपटातून त्यांना या गोष्टी समजत आहेत”, असं मत तिने मांडलं.




‘छावा’ या चित्रपटाविषयी केलेल्या पोस्टनंतर आस्तादला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यावर त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. “मला माझं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मला तो चित्रपट आवडला नाही. कदाचित त्या पोस्टमधला माझा शब्द चुकला असेल. फिल्म वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा मला ती फिल्म आवडली नाही, असं म्हणणं जास्त चांगलं ठरलं असतं. या चित्रपटासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली आहे. खूप प्रामाणिकपणे त्याने भूमिका साकारली आहे. सेट अप्रतिम होता, युद्धाचे काही प्रसंग चांगले होते. पण फक्त याचमुळे चित्रपट होत नाही असं मला वाटतं”, असं आस्ताद म्हणाला.