‘मिर्झापूर 3’मधल्या सलोनी भाभीने इंटिमेट सीन्सविषयी केला खुलासा; म्हणाली..
'मिर्झापूर' या वेब सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमधील सलोन भाभीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. नेहा सरगमने ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी नेहा मोकळेपणे व्यक्त झाली.
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षकांना फार उत्सुकता होती. पहिल्या दोन सिझन्सच्या यशानंतर तिसऱ्या सिझनची अनेकांना प्रतीक्षा होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली. मात्र या सीरिजला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. गुड्डू भैय्या आणि गोलू दीदी हे दोघं संपूर्ण सिझनमध्ये दिसले. पण तरीही प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडण्यात त्यांना अपयश आलं. या मोठ्या कलाकारांमध्ये त्यागी कुटुंबाची सून म्हणजेच सलोनी भाभीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. अभिनेत्री नेहा सरगमने ही भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये तिचे काही इंटिमेट सीन्ससुद्धा आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘मिर्झापूर 3’ या सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी तिने सांगितलं. त्याचप्रमाणे इंटिमेट सीन्सबद्दल दिग्दर्शकांना आधीच स्पष्टता दिली होती, असंही ती म्हणाली. कोणते सीन्स करू शकेन आणि कोणते नाही, याबद्दल आधीच दिग्दर्शकांना सांगितलं होतं, असं नेहाने सांगितलं. अभिनेता विजय वर्माने अशा सीन्समध्ये कॅमेरासमोर संकोचलेपणा दिसू नये, बरीच मदत केली, असंही तिने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
इंटिमेट सीन्सबद्दल विचारलेल्या प्रश्नावर नेहा म्हणाली, “त्यात इंटिमेट सीन्स जरा जास्तच होते. त्यासाठी मी, विजय वर्मा आणि दिग्दर्शक गुरमीत सिंह एकत्र बसलो होतो. कोणते सीन्स होऊ शकतील आणि कोणते नाही, याविषयी आम्ही नीट चर्चा केली. जर कथेची गरज असेल तरच हे सीन्स होऊ शकतील किंवा होऊ शकणार नाहीत, हे मी त्यांना आधीच स्पष्ट केलं होतं. दिग्दर्शकांनी ते समजून घेतलं. तू कम्फर्टेबल नसशील तर आम्ही तुला बळजबरी करणार नाही, असं दिग्दर्शकांनी मला सांगितलं होतं.”
विजय वर्माबद्दल ती पुढे म्हणाली, “विजय वर्माने सेटवर व्यवस्थित काळजी घेतली. त्यांनी मला समजून घेतलं. शूटिंग झाल्यानंतर त्यातून काही सीन्स हटवण्यात आले. पण विजयसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. जर विजय वर्मा नसता तर कदाचित मी असा परफॉर्मन्स देऊ शकले नसते.”