पाकिस्तानी कलाकारांना विरोध मग शाहरुखचा ‘रईस’ कसा प्रदर्शित होऊ दिला? अमेय खोपकरांचं उत्तर
फवाद खानच्या आगामी 'अबीर गुलाल' या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं विरोध केला आहे. पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यावर त्यांना शाहरुख खानच्या 'रईस'बद्दल प्रश्न विचारण्यात आला.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. पाकिस्तानी कलाकारांचा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत खोपकरांना शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पाकिस्तानी कलाकारांना विरोध आहे तर मग शाहरुखचा ‘रईस’ कसा प्रदर्शित होऊ दिला, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर खोपकरांनी सांगितलं की, “रईस हा शेवटचा चित्रपट होता.”
“पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ द्यायचे नाही ही भूमिका तुमची व्यक्तीगत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची आहे की पक्षाची आणि राज ठाकरेंची आहे? कारण ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या वेळीसुद्धा जेव्हा हा वाद तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पोहोचला होता, तेव्हा त्या बोलण्यांमध्ये स्वत: राज ठाकरे होते. त्यावेळीसुद्धा हे मान्य झालं होतं की भारतात पाकिस्तानी कलाकारांचं शूटिंग होणार नाही. नंतर शाहरुखचा ‘रईस’ हा चित्रपट आला, तेव्हा तो ‘शिवतीर्था’वर पोहोचला होता. त्यावेळी अशाच पद्धतीची विनंती करण्यात आली होती आणि तो चित्रपट प्रदर्शित होऊ दिला,” असा प्रश्न खोपकरांना विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देताना अमेय खोपकर म्हणाले, “रईस हा शेवटचा चित्रपट होता. शाहरुख हे विचारायला आला होता की मी उरलेली शूटिंग दुबईमध्ये करू का? त्यावेळी अशी भूमिका होती की इथे काहीच करायचं नाही. त्यानंतर एकाही पाकिस्तान कलाकाराचा किंवा पाकिस्तानी चित्रपट आम्ही इथे प्रदर्शित होऊ दिला नाही. मागच्या वर्षी एक चित्रपट येऊ घातला होता. त्यालाही विरोध करण्यात आला होता. पाकिस्तानी कलाकारांना विरोध आणि पाकिस्तानी चित्रपटांना इथे विरोध ही पक्षाची आणि मनसे चित्रपट सेनेची अधिकृत भूमिका आहे.”




“हिंदीतल्या इतर चित्रपट निर्मात्यांनाही मान्य नाही. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन इथे चित्रपट प्रदर्शित करण्याला त्यांचादेखील विरोध आहे. प्रोड्युसर असोसिएशनचा शंभर टक्के विरोध आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्यासाठी मी त्यांना पत्रदेखील देणार आहे. या चित्रपटाची जी डिस्ट्रिब्युशन कंपनी असेल, त्यांना एकच सांगतो की तुम्ही जर त्यांचा चित्रपट डिस्ट्रिब्युट करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला इतरदेखील चित्रपट डिस्ट्रिब्युट करू देणार नाही,” असाही इशारा त्यांनी दिला आहे.