Mohit Raina | “ज्या दिवशी महादेवची भूमिका मिळाली त्याच दिवशी माझे वडील..”, मोहित रैनाचा खुलासा
अभिनेता मोहित रैनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'देवों के देव महादेव' या मालिकेतील भूमिकेविषयी मोठा खुलासा केला. या मालिकेत त्याने महादेवची भूमिका साकारली होती. मात्र ज्या दिवशी त्याला ही भूमिका मिळाली, त्याच दिवशी मोठी घटना घडली.
मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : अभिनेता मोहित रैनाने ‘देवों दे देव महादेव’ या मालिकेत शंकराची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. सध्या तो ‘फ्रिलान्सर’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोहितने त्याच्या दिवंगत वडिलांविषयी मोठा खुलासा केला. ज्या दिवशी त्याची ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी निवड झाली, त्याच दिवशी वडिलांना गमावल्याचं दु:ख मोहितने व्यक्त केलं. रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला मोहितने ही मुलाखती दिली आहे.
ज्या दिवशी भूमिका मिळाली, त्याच दिवशी..
या मुलाखतीत मोहित म्हणाला, “मी हे कधीच बोललो नाही, पण माझे वडील शंकराचे फार मोठे भक्त होते. त्यामुळे ही भूमिका म्हणजे माझ्या वडिलांकडून मला मिळालेली भेट आहे. कारण ज्यादिवशी मला महादेवची भूमिका मिळाली, त्याच दिवशी मी माझ्या वडिलांना गमावलं. त्यामुळे ती भूमिका मिळणं म्हणजे माझ्यासाठी एक भेट समजतो. कारण यात काही योगायोग असू शकत नाही. माझ्या वडिलांकडून मिळालेली ती भेट असल्याने मला त्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा होता.”
करिअरच्या शिखरावर असताना मोठा निर्णय
‘देवों के देव महादेव’ या मालिकेच्या प्रचंड यशानंतर मोहितने 2008 मध्ये ‘डॉन मुत्थूस्वामी’ या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील भूमिकेमुळे मोहितला इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने शिद्दत आणि मिसेस सिरीयल किलर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर असताना मोहितने त्याच्या करिअरमधील सर्वांत मोठा निर्णय घेतला. टीव्हीमध्ये पैसा, प्रसिद्धी मिळत असूनही त्याने चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
कोणत्याही निर्णयाचा पश्चात्ताप नाही
या निर्णयाविषयी तो एका मुलाखतीत म्हणाला, “मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा मी पैसा किंवा प्रसिद्धीसाठी झटत नव्हतो. मला त्या गोष्टींचा मोहच नव्हता, म्हणून गमावण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. मला फक्त माझ्या क्रिएटिव्ह गरजा पूर्ण करायच्या होत्या. कॅमेरासोबत जणू माझं रिलेशनशिपच होतं आणि त्यामुळे मी कोणत्या माध्यमात काम करतोय, त्याने मला कधी फरक पडलाच नाही. मला माझ्या कोणत्याही निर्णयाचा पश्चात्ताप नाही आणि सुदैवाने देवानेही मला चांगल्या संधी दिल्या आहेत.”
टेलिव्हिजन आणि चित्रपटांनंतर मोहितने वेब विश्वातही आपली वेगळी छाप सोडली. ‘मुंबई डायरीज 26/11’ आणि ‘द फ्रिलान्सर’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.