Dahi Handi: “ही काय परंपरा आहे असं म्हणण्यापेक्षा..”; दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
स्पेन, चीनसारख्या देशांत पिरॅमिड म्हणून या प्रकाराचा खेळात समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत आहे.
दहीहंडीला (Dahi Handi) साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसंच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांसाठीही आरक्षण मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा द्यावा आणि त्यानिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. त्याला उत्तर देताना शिंदेंनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सांगितलं. दहीहंडीनिमित्त त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दहीहंडीसुद्धा फोडली.
“या खेळाचं एक वैशिष्ट्य मला वाटतं की आजकाल वर जाणाऱ्याचे पाय खेचणारे अनेकजण असतात. हे बघायला मिळत असताना वर चढणाऱ्याला आधार देऊन, त्याचे पाय घट्ट धरून ठेवणं, हे गोविंदा पथक दाखवतं. त्यामुळे त्याच्यात एक वेगळेपण आहे,” असं यावेळी कोल्हे म्हणाले. “आपला प्रत्येक सण काही ना काही शिकवून जातो. त्यामुळे याकडे डोळे, कान आणि मन उघडं ठेवून पाहावं. ही काय परंपरा आहे असं म्हणण्यापेक्षा यातून नेमकं काय शिकता येऊ शकतं हे जर समोर आलं तर आपल्या संस्कृतीमध्ये नक्कीच तेवढी ताकद आहे की ती आपल्याला जगण्याचा मार्ग देऊ शकेल,” असंही ते पुढे म्हणाले.
“सत्तेची हंडी फोडण्यासाठी प्रत्येकजण आतूर आहे. हंडीतील लोणी ही कोणा एकाच्याच मुखात न जाता सामान्य रयतेच्या मुखापर्यंत ती पोहोचावी यासाठी छत्रपती शिवाजी महाजारांनी प्रयत्न केले होते. तोच दृष्टीकोन आताच्या राजकारण्यांनी समोर ठेवावा,” असं मत अमोल कोल्हेंनी यावेळी व्यक्त केलं.
स्पेन, चीनसारख्या देशांत पिरॅमिड म्हणून या प्रकाराचा खेळात समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत आहे. दहीहंडी हा सण-उत्सव असला तरी त्यातील साहस आणि क्रीडा कौशल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं.