“माझ्याच ऑफिसमध्ये येऊन बोलणार की शक्तीमान..”; रणवीर सिंहवर का भडकले मुकेश खन्ना?
शक्तीमान या पात्रावर लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र मुकेश खन्ना यांच्याकडून त्याला परवानगी मिळाली नाही.
‘शक्तीमान’ या मालिकेनं 1997 पासून 2005 पर्यंत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या चित्रपटात मुकेश खन्ना यांनी शक्तीमानची भूमिका साकारली होती. 2022 मध्ये सोनी पिक्चर्स इंडियाने ‘शक्तीमान’ या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासूनच या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह शक्तीमानची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. याबाबत मुकेश यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते शक्तीमानच्या पोशाखातच आले होते. यावेळी त्यांनी रणवीरबद्दल काही वक्तव्ये केली असून त्यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगनंतर त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट लिहित काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
पत्रकार परिषदेत मुकेश खन्ना यांचा विचारण्यात आलं होतं की रणवीर सिंहला त्यांच्या कार्यालयाबाहेर तासनतास प्रतीक्षा करावी लागली होती का? त्यावर ते म्हणाले, “नाही, मी त्याला प्रतीक्षा करण्यासाठी बळजबरी केली नव्हती. त्याला गरज होती म्हणून तो तीन तासांसाठी बसला होता. तो माझ्या ऑफिसमध्ये आला आणि आम्ही एकमेकांचा सहवास एंजॉय केला. तो भन्नाट अभिनेता आहे आणि त्यात भरपूर ऊर्जा आहे. पण शक्तीमान कोण साकारणार हे मी ठरवणार. निर्माते अभिनेत्यांची निवड करतात, अभिनेते निर्मात्याला निवडत नाहीत. तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन बोलणार की तुला शक्तीमान साकारायचा आहे, तर याची परवानगी नाही.”
शक्तीमानची भूमिका साकारण्यासाठी रणवीर खूप आतूर असल्याचं ते म्हणाले. “तुम्ही म्हणाल की शक्तीमान साकारण्यासाठी मोठ्या कलाकाराची गरज आहे तर ते खरं नाही. शक्तीमान साकारण्यासाठी तसा चेहरा असणं गरजेचं आहे. मला सांगा, अक्षय कुमारने साकारलेली पृथ्वीराज चौहानची भूमिका प्रेक्षकांना का पटली नाही? कारण त्याने विग आणि खोटी मिशी लावली होती”, असं खन्ना पुढे म्हणाले. त्यांच्या या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘मीच पुढचा शक्तीमान बनणार’ असं लिहून मुकेश खन्ना यांचे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. त्यावर आता त्यांनी एक्सवर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे.
‘या गाण्याच्या आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मीच पुढचा शक्तीमान होणार हे जगासमोर सांगण्यासाठी आलो होतो, असा एक गैरसमज जो प्रेक्षकांच्या एका वर्गात निर्माण झाला आहे, त्याबद्दल मी स्पष्टीकरण देतो. हे सर्व एकदम चुकीचं आहे, मी तुम्हाला सर्वकाही समजावून सांगतो’, असं लिहित त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत.
1- सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे मी पुढचा शक्तीमान होणार असं मी का म्हणेन? मी आधीपासूनच शक्तीमान आहे. जर आधीपासूनच एक शक्तीमान असेल तर त्यानंतर दुसरा शक्तीमान प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि तो पहिला शक्तीमान मीच आहे. माझ्याशिवाय दुसरा शक्तीमान असूच शकत नाही. शक्तीमान म्हणून मला शक्तीमानचा वारसा तयार करायचा आहे.
2- दुसरी गोष्ट म्हणजे मी हे दाखवण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी आलो नाही की मी रणवीर सिंहपेक्षा किंवा जो कोणी शक्तीमानची भूमिका साकारेल त्याच्यापेक्षा चांगला आहे.
3- मी जुना शक्तीमान म्हणून तुमच्यासमोर आलो आणि मला आताच्या पिढीला एक संदेश द्यायचा होता, म्हणून मी पत्रकार परिषद घेतली. कारण जुना शक्तीमानचा प्रेक्षकवर्ग हा गेल्या 27 वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे नव्या शक्तीमानपेक्षा मी प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो, असं मला वाटलं होतं.
4- जुना शक्तीमान म्हणून मी देशभक्तीपर प्रश्नमंजुषा गाणं घेऊन आलो, कारण प्रत्येकाने हे स्पष्टपणे पाहिलं पाहिजे की आजकालच्या मुलांवर अंधार आणि वाईटाचा प्रभाव आहे. शक्तीमानच्या भाषेत असं म्हणता येईल, ‘अंधेरा कायम हो रहा है’. त्यामुळे हा संदेश तातडीने पोहोचवण्याची गरज आहे.
5- नवा शक्तीमान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तो कोण असेल, हे मी सांगू शकत नाही. कारण मलासुद्धा अद्याप त्याविषयी काहीच माहीत नाही. सध्या शोध सुरू आहे.