Nana Patekar | ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘मल्हारी’ गाण्यावर भडकले नाना पाटेकर; थेट भन्साळींना फोन करून म्हणाले..
अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील 'मल्हारी' गाण्याचा उल्लेख केला. हे गाणं ऐकल्यानंतर त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना थेट फोन केला अन्..
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिलेल्या विविध मुलाखतींमधील वक्तव्यांमुळे नाना चर्चेत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाबाबतचा एक किस्सा सांगितला. नाना पाटेकर यांना भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘मल्हारी’ हे गाणं अजिबात आवडलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी फोन करून भन्साळींना याविषयी नाराजी व्यक्त केली होती.
नाना पाटेकर हे जवळपास चार-पाच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात ते कोविड वॅक्सीनचे क्रिएटर डॉक्टर भार्गव यांची भूमिका साकारणार आहेत. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यावेळी नानांनी सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. सोशल मीडियावरही त्यांच्या कमबॅकची जोरदार चर्चा झाली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नाना चित्रपटाच्या कथेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. खऱ्या आयुष्यातील कथेवर आधारित चित्रपटांमध्ये तथ्यांशी छेडछाड केली जाऊ नये, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.
“जेव्हा तुम्ही म्हणता की ही खरी कथा आहे, खऱ्या घडामोडींवर आधारित आहे, तेव्हा आपण निर्मात्यांना काही प्रश्न विचारू शकतो. कारण तथ्यांशी ते छेडछाड करू शकत नाहीत. जर ती खरी कथा असेल तर त्याबद्दल दाखवलेली प्रत्येक गोष्ट खरी असली पाहिजे. हे तुम्ही भन्साळींच्या चित्रपटांमध्ये पाहू शकता. मी ‘मल्हारी’ या गाण्यामुळे खूप नाराज होतो. तेव्हा मी थेट भन्साळींना फोन केला आणि त्यांना विचारलं की “हे वाट लावली.. वगैरे काय आहे?” मला ते अजिबात आवडलं नव्हतं आणि ते मी ते स्पष्ट त्यांना सांगितलं. इतर लोकांना ते आवडेल की नाही याचा मी विचार करत नाही. पण मला ते आवडलं नाही आणि ते मी त्यांना सांगितलं.”
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘मल्हारी’ हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं, तेव्हासुद्धा त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र नंतर हेच गाणं सोशल मीडियावर तुफान हिट झालं.