‘ॲनिमल’बद्दल नाना पाटेकरांनी पहिल्यांदाच मांडलं मत; म्हणाले..
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटाबद्दल अभिनेते नाना पाटेकर यांनी आपलं पहिलं मत मांडलं आहे. नानांनी सुरुवातीला हा चित्रपट पाहणं टाळलं होतं. त्यांना त्यात काहीच रस नव्हता. मात्र जेव्हा त्यांनी पाहिला, तेव्हा त्यातील एका कलाकाराची भूमिका त्यांना खूप आवडली.
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. अनेक नामवंत कलाकारांनीही या चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप नोंदवला होता. आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी या चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. नानांनी सुरुवातीला ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहण्यात कोणताच रस नसल्याचं सांगितलं होतं. मात्र जेव्हा त्यांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना त्यातील एका अभिनेत्याचं काम खूप आवडलं होतं. त्या अभिनेत्याला त्यांनी स्वत: फोन केला आणि मिश्किल अंदाजात त्याचं कौतुक केलं.
‘ॲनिमल’ या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर नानांनी अनिल यांना फोन केला आणि मस्करीत म्हणाले, “तुझा अनिल-मल चित्रपट मी पाहिला.” नाना पाटेकर हे सुरुवातीला ‘ॲनिमल’ चित्रपट बघण्याविषयी संभ्रमात होते. मात्र जेव्हा त्यांनी पाहिला, तेव्हा त्यातील अनिल कपूर यांची भूमिका त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळी आणि हटके वाटली. ज्याप्रकारे ते आपल्या भावनांवर ताबा मिळवतात, ते पडद्यावर अनिल कपूर यांनी उत्तमरित्या साकारल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘ॲनिमल’ हा बॉलिवूडमधील सर्वांत मोठा चित्रपट असून त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटाने भारतात 554 कोटी रुपये तर जगभरात 915 कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत असतानाही थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली होती. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांचे दोन वेगवेगळे मत निर्माण झाले आणि त्यात दोन गट पडले. काहींना रणबीरची भूमिका आवडली, तर काहींनी त्यातील हिंसेवरून टीका केली. ’12th फेल’ या चित्रपटात झळकलेले शिक्षक आणि नागरी सेवक विकास दिव्यकिर्ती यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटावर बरीच टीका केली होती. हा चित्रपट बनायलाच पाहिजे नव्हता, असं मत त्यांनी मांडलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी ‘ॲनिमल’ला ‘अश्लील आणि असभ्य’ म्हटलं होतं.