Nana Patekar | शाहरुखबद्दल बोलताना नाना पाटेकरांचे बदलले सूर; म्हणाले “तो माझ्या छोट्या भावासारखा”
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचं कौतुक केलं आहे. तो माझा छोटा भाऊ आहे, मला त्याच्याशी कोणती समस्या का असेल, असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी 'जवान' चित्रपटावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचं म्हटलं गेलं होतं.

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी ‘द वॅक्सिंग वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट येत्या 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीच ‘द वॅक्सीन वॉर’चं दिग्दर्शन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं जात आहे. याच दरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्या एका मुलाखतीत शाहरुख खानचं तोंडभरून कौतुक केलं. नानांनी शाहरुखला आपला छोटा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी असंही सांगितलंय की बऱ्याच वर्षांपूर्वी नानांनीच घोषणा केली होती की शाहरुख खान एक दिवस सुपरस्टार बनणार.
काय म्हणाले नाना?
नाना पाटेकर यांनी नुकतीच ‘न्यूज 18’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना शाहरुख खानचा फोटो दाखवण्यात आला आणि त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर नाना म्हणाले की, “तो खूपच प्रतिभावान कलाकार आहे. त्याचा पहिला चित्रपट माझ्यासोबतच होता. राजू बन गया जेंटलमन असं त्याचं नाव होतं. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहरुखने खूप आधीच हा चित्रपट साइन केला होता आणि हाच त्याचा पहिला चित्रपट होता. त्यावेळी मी त्याला म्हटलं होतं की एके दिवशी तू खूप मोठा स्टार बनशील. ही गोष्ट तुम्ही वाटल्यास शाहरुखलाही विचारा. पहिल्याच चित्रपटाच्या वेळी मी त्याला हे बोललो होतो. आज सुद्धा तो मला त्याच नम्रतेने भेटतो, जता तो मला आधी भेटायचा. मला त्याच्याशी कोणतीच समस्या नाही. तो माझा आपलाच आहे. माझा छोटा भाऊ आहे. मला त्याच्याशी कोणती समस्या का असेल?”
नानांचा अप्रत्यक्ष निशाणा
याआधी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी अप्रत्यक्षपणे शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटावर टिप्पणी केल्याचं म्हटलं गेलं होतं. बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा चित्रपट त्यांनी पाहिल्याचं सांगितलं होतं. मात्र तो चित्रपट संपेपर्यंत मी सहन करू शकलो नाही, त्यामुळे मी पूर्ण चित्रपट पाहिला नाही, असंही ते म्हणाले होते. हा टोमणा त्यांनी अप्रत्यक्षपणे सनी देओलच्या ‘गदर 2’ आणि शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाला मारल्याची चर्चा होती. कारण त्यावेळी हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत होते.



