‘द केरला स्टोरी चित्रपट पाहिला नाही आणि पाहण्याचा इरादा नाही कारण…’; नसीरूद्दीन शाह यांचं खळबळजनक विधान!
'द केरला स्टोरी' चित्रपपटानंतर देशभरात गायब झालेल्या मुलींची आकडेवारी समोर येत आहे. चित्रपट पाहून अनेकांनी पूढे येत त्यांचे अनुभव सांगितले. अशातच यावर नसीरूद्दीन शहा यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरून बराच मोठा वाद निर्माण झाला आहे. पण जरी हा चित्रपट वादात सापडला असला तरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. तसंच या चित्रपटावरून वाद निर्माण झाल्याने त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आता प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.
नसीरूद्दीन शाह यांनी नुकतीच इंडिया टूडेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी द केरला स्टोरी चित्रपटाबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, अफवाह सारख्या योग्य चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. कारण लोकं द केरला स्टोरी पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात होते.
नसीरूद्दीन शाह यांनी सांगितलं की, त्यांनी द केरला स्टोरी हा चित्रपट पाहिला नाहीये. तसंच हा चित्रपट पाहण्याचा त्यांचा इरादा नाही. कारण त्यांनी याबाबत बरंच काही वाचलं आहे. तसंच नसीरूद्दीन यांनी या चित्रपटाच्या यशाबाबत बोलताना त्याचं धोकादायक ट्रेंड म्हणून वर्णन केलं आहे.
नसीरूद्दीन शाह यांनी ट्रेंडची तुलना नाझी जर्मनीशी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, हा अतिशय धोकादायक ट्रेंड आहे. त्यामुळे आपण नाझी जर्मनीच्या दिशेने वाटचाल करत आहोत यात काही शंका नाही. हिटलरच्यावेळी अनेक निर्मात्यांना नियुक्त करत त्यांना चित्रपट बनवण्यास सांगितलं होतं. याच कारणांमुळे अनेक दिग्गज चित्रपट निर्माते जर्मनी सोडून हॉलिवूडमध्ये गेले आणि आता इथेही असंच काहीसं घडत आहे.