Jawan | दीपिकामुळे ‘जवान’च्या दिग्दर्शकावर नयनतारा नाराज? पुन्हा बॉलिवूडमध्ये करणार नाही काम?
'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री नयनतारा ही दिग्दर्शक अटलीवर खूप नाराज झाल्याचं कळतंय. या नाराजीमागचं कारण अभिनेत्री दीपिका पादुकोण असल्याचं म्हटलं जात आहे. दीपिकामुले नयनतारा पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार नाही, अशीही चर्चा आहे. जाणून घेऊयात सविस्तर वृत्त..
मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनताराने शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली. मात्र दीपिकामुळेच नयनतारा ही दिग्दर्शक अटलीवर खूप नाराज असल्याचं कळतंय. चित्रपटात नयनताराची मुख्य भूमिका असतानाही तिला बाजूला सारून शाहरुख आणि दीपिकालाच अधिक महत्त्व दिल्याची तक्रार तिने केली आहे. जवान या चित्रपटात शाहरुखने बापलेकाच्या दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर नयनतारा यामध्ये पोलीस अधिकारीच्या भूमिकेत आहे.
मुख्य चित्रपटातील नयनताराची भूमिका कमी करण्यात आली आणि दीपिकाच्या भूमिकेला अधिक महत्त्व दिलं गेलं, अशी तक्रार तिने केली आहे. ‘जवान’मध्ये शाहरुखसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख आणि दीपिकाचाच सगळीकडे बोलबोला पहायला मिळाला. या सर्वांत नयनताराचं महत्त्व कमी झालं. त्यामुळे पहिल्यावहिल्या हिंदी चित्रपटात असा अनुभव आल्यानंतर नयनतारा पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचंही कळतंय.
जवानमध्ये दीपिका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होती. मात्र तिच्या भूमिकेला इतकं मोठं दाखवलं गेलं की तिच्यासमोर नयनताराचं महत्त्व कमी झालं. अचानक हा चित्रपट शाहरुख-दीपिकाचा चित्रपट म्हणून ओळखला जाऊ लाहगला. म्हणूनच नयनतारा यावर खूप नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच कारणामुळे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नयनतारा कुठेच झळकली नाही, असंही म्हटलं जात आहे. ‘जवान’च्या यशानंतर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमालाही नयनतारा उपस्थित नव्हती. ‘जवान’ या चित्रपटाने दोन आठवड्यांमध्ये जगभरात 900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर देशभरात या चित्रपटाने 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
जवान या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारासोबतच विजय सेतुपतीचीही मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सुनील ग्रोवर हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध दिग्दर्शक अटलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.