‘Super Dancer 3’मध्ये लहान मुलांना विचारले अश्लील प्रश्न; चॅनलला नोटीस बजावताच अनुराग बासू यांनी सोडलं मौन
NCPCR ने 25 जुलै रोजी सोनी वाहिनीला नोटीस बजावली होती. त्यांनी हा वादग्रस्त एपिसोड आणि व्हायरल होत असलेला व्हिडीओ सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वाहिनीला त्याप्रकरणी उत्तर देण्यास सांगितलं आहे.
मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : ‘सुपर डान्सर 3’ हा डान्स रिॲलिटी शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये परीक्षकांनी लहान मुलांना अश्लील प्रश्न विचारल्याने हा वाद सुरू झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनला नोटीस बजावली आहे. हा एपिसोड 2019 मध्ये प्रसारित झाला होता. त्यावेळी दिग्दर्शक अनुराग बासू, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर गीता कपूर या शोचे परीक्षक होते. या संपूर्ण प्रकरणावर आता अनुराग बासू यांनी मौन सोडलं आहे. ती घटना लज्जास्पद आहे आणि त्याचा मी अजिबात बचाव करणार नाही, असं ते म्हणाले.
NCPCR ने 25 जुलै रोजी सोनी वाहिनीला नोटीस बजावली होती. त्यांनी हा वादग्रस्त एपिसोड आणि व्हायरल होत असलेला व्हिडीओ सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वाहिनीला त्याप्रकरणी उत्तर देण्यास सांगितलं आहे. ‘सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या सुपर डान्सर 3 चा एक व्हिडीओ आयोगाला ट्विटरवर मिळाला आहे. यामध्ये शोचे परीक्षक लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांविषयी अश्लील प्रश्न विचारताना दिसले. हे अत्यंत चुकीचं असून आयोगाच्या दिशानिर्देशांचं स्पष्ट उल्लंघन आहे’, असं या नोटिशीत म्हटलंय.
काय म्हणाले अनुराग बासू?
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुराग बासू यांनी याप्रकरणी मौन सोडलं आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी त्याच्या बचावात काही म्हणणार नाही कारण मी समजू शकतो की आई-वडिलांसाठी हे लज्जास्पद होतं. मी स्वत: दोन मुलांचा पिता आहे. सुपर डान्सर हा लहान मुलांचा शो आहे. तिथे अनेकदा मुलं निरागसेने असं काही बोलून जातात, ज्यावर आमचंही नियंत्रण नसतं. मी तो संवाद चुकीच्या बाजूने न्यायला पाहिजे नव्हता, ज्यामुळे स्पर्धकाला असं काही आक्षेपार्ह बोलावं लागलं.”
स्पर्धकांना कोणते प्रश्न विचारले जावेत याविषयी एक मर्यादा असावी, हेसुद्धा त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. “परीक्षक असल्यामुळे आम्ही जबाबदारीचं पालन करणं खूप गरजेचं आहे. लहान मुलांना कोणते प्रश्न विचारावेत, याविषयी सजग राहणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की यानंतर लहान मुलंसुद्धा बोलण्याबद्दल अधिक जागरून होतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं.