मुलाच्या लग्नात वडील राज बब्बर यांनाच बोलावलं नाही; नवरी म्हणाली “जे महत्त्वाचे..”
अभिनेता प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलंय. अभिनेत्री प्रिया बॅनर्जीशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. मात्र या लग्नाला त्याने वडील राज बब्बर यांनाच बोलावलं नाही. यावर आता प्रतीक आणि त्याची पत्नी प्रियाने मौन सोडलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने नुकतीच लग्नगाठ बांधली. प्रतीकने अभिनेत्री प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं असून सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. प्रतीक आणि प्रिया हे त्यांच्या घरातच लग्नबंधनात अडकले आणि या लग्नाला फक्त मोजकेच कुटुंबीय, मित्रमैत्रिणी उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे मुलाच्या लग्नात वडील राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हते. याबाबत प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य आणि सावत्र बहीण जुही बब्बर यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीक आणि प्रिया यांनी यावर मौन सोडलं आहे.
प्रतीकची पत्नी प्रिया बॅनर्जी म्हणाली, “लग्न किंवा आमच्या कोणत्याच कार्यक्रमातून कुटुंबातील कोणतीही व्यक्ती गायब नव्हती. कुटुंबातील सदस्य अनुपस्थित होते अशा अफवा का पसरवल्या जात आहेत हे मला माहीत नाही. आमच्या कुटुंबातील लोक तिथे होते, त्यात माझे आई-वडील, त्याच्या मावश्या, ज्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, त्याचे आजी-आजोबा, जे लोक आमच्यासाठी महत्त्वाचे होते ते सर्वजण आमच्यासोबत लग्नात उपस्थित होते. कुटुंबातील कोणीही गायब नव्हतं.”




View this post on Instagram
याविषयी ती पुढे म्हणाली, “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास प्रतीकशी लग्न करणं आणि विवाहित असणं यात मला काही वेगळं काही वाटत नाही. आम्ही खूप वर्षांपासून सोबत राहतोय. जवळपास पाच वर्षे झाली आहेत. आम्ही एकाच घरात राहतोय. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. त्यामुळे मला असं वेगळं काही वाटत नाहीये.”
प्रियासोबतच्या लग्नाबद्दल प्रतीक म्हणाला, “मला असं वाटलं की जणू मी हजार वेळा लग्न करतोय. हे आणखी एक आयुष्य आणि आणखी एक ब्रह्मांडासारखं वाटत होतं. माझ्या प्रत्येक जन्मात आणि प्रत्येक ब्रह्मांडात मी तिच्याशी लग्न केलंय असं मला जाणवत होतं. अजूनही बरंच काही बाकी आहे.”
प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य याने खुलासा केला होता की त्याच्या लग्नात बब्बर कुटुंबातील कोणत्याच सदस्यांना बोलावलं नव्हतं. इतकंच काय तर वडील राज बब्बर यांनासुद्धा त्याने लग्नासाठी आमंत्रित केलं नव्हतं, असं त्याने म्हटलं होतं. याबाबत प्रतीकची सावत्र बहीण जुहीसुद्धा हेच म्हणाली. “प्रतीक माझा भाऊ आणि आम्ही राज बब्बर यांची मुलं आहोत ही बाब कोणीच बदलू शकत नाही. सध्या त्याच्या अवतीभवती अशी काही लोकं आहे, ज्यांची नावं मला आता घ्यायची नाहीत, ज्यांनी त्याच्यावर खूप प्रभाव टाकलाय. परंतु आम्हाला त्याला अडचणीत आणायचं नाहीये. कारण त्याने कोणाचंच भलं होणार नाही”, असा दावा तिने केला होता.