अलिबाग | 4 ऑगस्ट 2023 : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांच्या भव्यदिव्य देखाव्यांनी सजलेल्या ज्या स्टुडिओच्या उभारणीत अनेक वर्षे घालवली, त्याच स्टुडिओतील मध्यभागी असलेल्या मंचावर कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार) दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या आत्महत्येमागे कर्जाचं डोंगर आणि फसलेलं अर्थ नियोजन असल्याचं म्हटलं जात आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी 11 क्लिप्समध्ये आपलं व्हॉईस रेकॉर्डिंग केलं होतं. त्यात त्यांनी उभारलेल्या एनडी स्टुडिओच्या परिसरातच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज चौक इथं अंत्यविधी केले जातील. (Art Director Nitin Desai News)
स्वप्नवत वाटावा असा भव्य एन.डी. स्टुडिओ उभारण्यासाठी जीवाचं रान करणारे विख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई अखेर आज या स्टुडिओतच विसावले. ज्या स्टुडिओत त्यांनी असंख्य स्वप्न पाहिली, डोळ्यांच पारणं फिटेल अशी कलाकुसर करत, भव्य सेट उभारले, त्याच स्टुडिओच्या कुशीत त्यांना कुटुंबीय, शेकडो चाहते यांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये एडलवाईज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला होता. आज देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
नितीन देसाई यांच्या पत्नीचं नाव नयना नितीन देसाई आहे. नयना देसाई एक निर्मात्या आहेत. नितीन देसाई आणि नयना देसाई यांच्या मुलांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव मानसी देसाई असं आहे. माणसी देसाई प्रोडक्शन कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहे. २००५ मध्ये देसाई यांनी एनडी स्टुडिओची स्थापना केली होती. त्याच सेटवर नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. देसाई यांचे कुटुंबीय आणि एनडी स्टुडिओतील कर्मचारी या अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी 10 ते 11 क्लिप्समध्ये आपलं व्हॉईस रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगमधून महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. कर्ज घेतलेल्या एडलवाईज कंपनीच्या वरिष्ठांवर त्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. याप्रकरणी एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. याचसोबत या व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी एका अभिनेत्याचाही उल्लेख केला, वाचा सविस्तर..
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार पार पडतील. जे. जे. रुग्णालयातून त्यांचं पार्थिव एनडी स्टुडिओत दाखल झालं आहे. मराठी आणि हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. दुपारी 12 ते 2 या वेळेत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.
“नितीन देसाई यांचा स्टुडिओ सरकारला कसा ताब्यात घेता येईल याची कायदेशीर बाबी तपासू. नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी रॅशेस शाह आणि एआरसी एडलवाईज या कंपन्यांची चौकशी केली जाईल,” असं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
नितीन देसाई यांचा शवविच्छेदन अहवाल 15 दिवसांनंतर येईल आणि तो पोलिसांकडे सोपवला जाईल अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
स्टुडीओमध्ये काम करणारा माजी कर्मचारी सचिन मोरे याने महत्त्वाची माहिती दिली आहे. जेव्हा सचिन याला नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल कळलं. तेव्हा तो घटनास्थळी दाखल झाला. सचिन याला नितीन देसाई यांच्या मृतदेहाबाजूला एक चिठ्ठी आढळली. चिठ्ठीमध्ये नितीन देसाई यांनी ‘माझं अंत्यसंस्कार स्टुडिओमध्येच करा..’ असं लिहीलं होतं. नितीन देसाई यांनी मोठ्या कष्टाने आणि संघर्षाने एनडी स्टुडीओची स्थापना केली होती. एनडी स्टुडीओवर नितीन देसाई यांचं प्रचंड प्रेम होतं. आज सायंकाळी ४ वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी एडलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड किंवा एडलवाईज ARC या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहेत. गुरुवारी रायगड पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांची चौकशी केली. यात त्यांची पत्नी आणि एनडी स्टुडिओतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये एडलवाईच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. ऑडिओची सुरुवात त्यांनी लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार अशी केली असून शेवट पाऊले चालती पंढरीची वाट असा केला आहे. ऑडिओमध्ये मधल्या काळात त्यांनी एडलवाईच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.
एडलवाईज कंपनीमुळे मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख नितीन देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये केला. एनडी स्टुडिओ हा कर्ज देणाऱ्या कंपनीच्या ताब्यात देऊ नका, अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या 10 ते 11 ऑडिओ क्लिप्सची तपासणी पोलिसांकडून होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे नेते आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जे. जे. रुग्णालयात नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर देसाई यांचं पार्थिव एनडी स्टुडिओकडे रवाना झालं आहे. एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील.
नितीन देसाई यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये स्वतःला संपवलं. निधनानंतर चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण केली आहे. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, ‘दिग्दर्शक नितीन देसाई यांचं चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टम केले आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचं कारण गळफास असल्याचं समोर येत आहे. पुढील तपास सुरू आहे.’ सध्या सर्वत्र नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? अशी चर्चा सुरु आहे.
मराठी माणसावर अन्याय करण्याची काही जणांची भूमिका आहे. एनडी स्टुडिओ बळकावण्याचा प्रयत्न आहे. कर्जावर अवास्तव व्याज आकारून वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. तो सहन करण्यापलीकडे आहे, अशी व्यथा नितीन देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये मांडली होती.
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील. तर दुपारी 12 ते 2 या वेळेत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांनी देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आला आहे. रायगड पोलिसांची एक टीम अॅम्ब्युलन्ससोबत जे जे रुग्णालयात पोहोचली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव पुन्हा ND स्टुडिओत नेलं जाणार आहे. नितीन देसाई यांच्या मृतदेहावर 5 तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदन झाल्यावर पार्थिव आज रात्रीच पुन्हा ND स्टुडिओत नेलं जाण्याची शक्यता आहे.
मुंबई :
नितीन देसाई यांचं अशाप्रकारे जाणं हे धक्कादायक आणि दुखद आहे. त्यांनी असा निर्णय घेणं धक्कादायक आहे. त्यांना अशाप्रकारे श्रद्धांजली वाहावी लागेल, असं कधीच वाटलं नव्हतं, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.
कर्जाच्या समस्येमुळे नितीन देसाई यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यांनी ही समस्या कधीच कोणासमोर बोलून दाखवली नाही. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांना गेल्या 21-22 वर्षांपासून ओळखतात. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं वृत्त ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसला. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी नितीन देसाई यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीदरम्यान आपण त्यांचं मन मोकळं करू शकलो नाही याची खंत तरडेंनी व्यक्त केली, वाचा सविस्तर..
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्विट करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘प्रख्यात कलादिग्दर्शक निर्माते नितीन चंद्रकांत देसाईंचे निधन अत्यंत दु:खदायक आणि वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टीबरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे.
नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांची नाव असल्याची माहिती समोर येत आहे, वाचा सविस्तर..
‘नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. ते प्रॉडक्शन डिझाइन क्षेत्रातील दिग्गज होते आणि आमच्या चित्रपटसृष्टीचा एक मोठा भाग होते. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांसाठी काम केलं. हे खूप मोठं नुकसान आहे. नितीन देसाई यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे आम्ही ‘OMG 2′ या चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रदर्शन पुढे ढकलतोय. उद्या सकाळी 11 वाजता हा ट्रेलर लाँच होईल,’ असं ट्विट अक्षयने केलं.
Unbelievably sad to know about the demise of Nitin Desai. He was a stalwart in production design and such a big part of our cinema fraternity. He worked on so many of my films… this is a huge loss. Out of respect, we are not releasing the OMG 2 trailer today. Will launch it…
— Akshay Kumar (@akshaykumar) August 2, 2023
“आज सकाळी ही बातमी ऐकली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. काही महिन्यांपूर्वी माझी आणि त्यांची भेट झाली होती. बाजीराव मस्तानी सिनेमासाठी त्यांनी आणि मी सहा महिने एकत्र काम केलं होतं. नितीन देसाई या नावाला एक भव्यता होती. त्यांनी असा का निर्णय घेतला, असा प्रश्न आहे. आयुष्यातील अनेक चढउतारांमध्येही ते नेहमी हसरे असायचे. त्यांच्यावर ओझं होतं हे ठाऊक होतं. पण त्याची कधी आम्ही चर्चा केली नाही. त्यांना मच्छिंद्र कांबळी यांच्यावर भव्यदिव्य सिनेमा काढायचा होता. कलाकार हा कायम हळवा आणि संवेदनशील असतो”, अशा शब्दांत अभिनेते विजू माने यांनी भावना व्यक्त केल्या.
नितीन देसाई यांच्यावर 252 कोटी रुपयांचं कर्ज होतं. गेल्याच आठवड्यात त्यांच्या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची याचिका न्यायालयाने मान्य केली होती. ND’s Art World Pvt Ltd या नितीन देसाईंच्या कंपनीने 2018 मध्ये ECL फायनान्सकडून दोन कर्जांद्वारे 185 कोटी रुपये घेतले होते. जानेवारी 2020 पासून या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या, वाचा सविस्तर..
नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत भावना व्यक्त केल्या. ‘ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा,’ असं त्यांनी लिहिलं आहे.
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस… pic.twitter.com/tJjqeXeH4q
— Raj Thackeray (@RajThackeray) August 2, 2023
‘ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे आज निधन झाले. ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. मराठी, हिंदी कलासृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे. टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांनी कायम जपली होती. येथील नवरात्रोत्सव त्यांच्यामुळे कायम अविस्मरणीय झाला. त्यांच्या हातून घडलेली कलाकृती पाहण्याची कायम उत्सुकता असे. इतका उमदा माणूस आणि मित्र आज आपण गमावल्याचे वृत्त वेदनादायी आहे. वैयक्तिक माझ्यासाठी आणि कलाक्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे. त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो,’ असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मोठी माहिती उघड केली आहे. ‘अत्यंत वाईट बातमी आहे. मराठी सिनेमासाठी नितीन देसाई गर्व होते. कलादिग्दर्शकापेक्षा जास्त ते माझे मित्र होते. मी प्रचंड दुःखी आहे. काय बोलावं कळत नाही. माणसाच्या डोक्यात काय सुरु आहे ते आपल्याला कळत नाही… आपल्यालानंतर कळतं आपण बोलायला हवं होतं का? आपण कधी बोलत नाही मित्र म्हणून भेटत नाही. कलादिग्दर्शक म्हणून ते बेस्ट होतेच.’
“हे दु:ख कधीच भरून काढता येणार नाही. त्यांच्याशी माझा तीन दिवसांपूर्वीच संवाद झाला होता. नवीन प्रोजेक्टबद्दल आम्ही चर्चा केली. मी नव्याने सुरू केलेल्या इन्स्टिट्यूटबद्दलही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यानंतर मुंबईला भेटायचं की पुण्याला यावरही आम्ही बोललो. नितीन देसाई हे नाव फक्त चित्रपटांपुरतं मर्यादित नव्हतं. असंख्य राजकीय सभांसाठीही त्यांनी सेट उभारला होता”, अशी प्रतिक्रिया अभिजीत पानसे यांनी दिली.
नितीन देसाई यांच्यावर 252 कोटी रुपयांचं कर्ज होतं. गेल्याच आठवड्यात त्यांच्या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची याचिका न्यायालयाने स्वीकारली होती. नितीन देसाई यांचे जवळचे मित्र आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं, “मी अनेकदा त्यांच्याशी बोलायचो आणि त्यांचं समुपदेशन करायचो. अमिताभ बच्चन यांनासुद्धा मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं. पण ते पुन्हा आयुष्यात कसे परतले हे मी त्यांना सांगितलं होतं. कर्जाचं डोंगर असलं तरी नव्याने सुरूवात केली जाऊ शकते, हे मी सतत त्यांना सांगायचो. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे.”
“देवदास शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांना चांगले ओळखलो. या चित्रपटाचा सेट खूप प्रसिद्ध झाला होता. त्याची जगभरात चर्चा झाली होती. परदेशातूनही लोकं तो सेट पहायला यायचे. माझ्या बहुतांश चित्रपटांचं शूटिंग त्यांच्याच स्टुडिओमध्ये झालं आहे. मागच्या वेळी त्याच्या घरी लग्न होतं, तेव्हा आम्ही बोललो होतो. तो असं टोकाचं पाऊल उचलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आम्ही जेव्हा कधी भेटायचो किंवा बोलायचो तेव्हा तो कधीच अस्वस्थ झाला किंवा कसली काळजी आहे असं वाटलं नव्हतं. घेतलेलं कर्ज आत्महत्येचं कारण असण्याची शक्यता आहे. कोविडनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ आला”, अशा शब्दांत अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी भावना व्यक्त केल्या.
नितीन देसाई यांचा मोबाईल पोलिसांना ताब्यत घेतला आहे. ज्या ऑडिओ क्लिपची आता चर्चा रंगत आहे, त्या ऑडीओ क्लिपची पडताळणी फॉरेन्सिक टीम करत आहे. नितीन देसाई यांनी काही लोकांची नावे या ऑडीओ क्लिपमध्ये रेकॉर्ड केल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण ती नावं कोणची आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही.. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. “ही खूप वाईट आणि दुर्दैवी बातमी आहे. त्यांच्याकडे प्रत्येक जण अत्यंत अभिमानाने बघत होतं. एक मराठी माणूस इतकं मोठं स्वप्न बघतो आणि ती स्वप्नपूर्ती करताना सर्वांशी उत्तम नातं जोडतो, हे पाहून खूप आनंद व्हायचा. मात्र त्यांचं असं कोणाशी काहीच न बोलता जाणं खूप क्लेशकारक आहे”, अशा शब्दांत आदेश बांदेकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. वाचा सविस्तर..
नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक प्रस्ताव केला होता. कर्ज घेताना नितीने देसाई ज्या जमिनी तारण ठेवल्या होत्या, त्यांची मालमत्ता जप्त करून आमची कर्जवसुली करुन द्या आसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. ती कारवाई नितीन देसाई यांच्यावर प्रलंबित आहे. त्यामुळे नितीन देसाई मानसिक त्रासात असावे अशी चर्चा समोर येत आहे. वाचा सविस्तर…