कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’वर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
कंगना राणौत यांचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी काही प्रतिष्ठित लोकांसाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती.
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या पहिल्या विशेष स्क्रिनिंगचं आयोजन नागपुरात करण्यात आलं. या स्क्रिनिंगला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना यांचा हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. देशातील आणीबाणीच्या घटनेवर या चित्रपटाची कथा आधारित असून त्यात कंगना यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात अनेक अडथळे आले होते. अखेर सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले काही सीन्स आणि डायलॉग्स काढून टाकल्यानंतर ‘इमर्जन्सी’ला प्रमाणपत्र देण्यात आलं.
पीटीआयशी बोलताना कंगना म्हणाल्या, “आज माझ्या चित्रपटाचं पहिलं स्क्रिनिंग आहे. याआधी कोणीच हा चित्रपट पाहिला नव्हता. सेन्सॉर बोर्ड अत्यंत कडक होतं आणि त्यांनी कसून तपासणी केली. आम्हाला बरेच पुरावे आणि कागदपत्रे सादर करावी लागली. सहा महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे.” हा चित्रपट पाहिल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले, “मी आज पहिल्यांदाच हा चित्रपट बघतोय. मी देशातील आणीबाणीचा साक्षीदार आहे. कंगना यांनी आज जनतेसमोर मांडलेला आणीबाणीचा इतिहास खरा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या चित्रपटाला जनतेचाही पाठिंबा मिळेल.”
View this post on Instagram
याशिवाय गडकरींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही याविषयी खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं, ‘इमर्जन्सी या चित्रपटाच्या नागपुरातील स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. यामध्ये कंगना राणौत आणि अनुपम खेर यांच्या भूमिका आहेत. आपल्या देशाच्या इतिहासातील काळोख्या अध्यायाला इतक्या प्रामाणिकपणे आणि उत्कृष्टतेतने सादर केल्याबद्दल मी चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांचे मनापासून आभार मानतो. भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचं चित्रण करणारा हा चित्रपट मी सर्वांना पाहण्याचं आवाहन करतो.’
‘इमर्जन्सी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेतते अनुपम खेरसुद्धा या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित होते. या चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी यांच्याही भूमिका आहेत.