Pathaan | महिनाभरापासूनच्या गोंधळानंतर बजरंग दल-VHP ची माघार; ‘या’ कारणामुळे आता करणार नाही ‘पठाण’चा विरोध
यातील एका दृश्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसते. याच दृश्यावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला. या दृश्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.
गुजरात: अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ हा चित्रपट उद्या (25 जानेवारी) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरून गेल्या महिनाभरापासून गोंधळ सुरू आहे. यातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून हा वाद सुरू झाला. यातील एका दृश्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसते. याच दृश्यावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला. या दृश्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नव्हे तर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली जाऊ लागली. मात्र आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे.
‘पठाण’विरोधात अनेक शहरांमध्ये निदर्शनं करणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना आता गुजरातमध्ये चित्रपटाचा विरोध करणार नाहीत. गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री अशोक रावल यांनी याविषयीची अधिकृत माहिती दिली. यावेळी त्यांनी चित्रपटात बदल सुचवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचं कौतुक केलं आणि चित्रपट पहायचा की नाही हे आता प्रेक्षकांनी ठरवावं, असं ते म्हणाले.
“बजरंग दलाने पठाणचा विरोध केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने त्यातील अश्लील गाणं आणि आक्षेपार्ह शब्दांवर कात्री चालवली आहे. ही चांगली बाब आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि हिंदू समाजाचं मी अभिनंदन करतो”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “मी सेन्सॉर बोर्ड, निर्माते आणि थिएटर मालकांना विनंती करतो की फिल्म इंडस्ट्रीचे एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून त्यांनी वेळीच जर धर्म, संस्कृती आणि देशभक्ती विचारात घेऊन अशा गोष्टींचा विरोध केला तर बजरंग दल आणि हिंदू समाजाला कोणताच आक्षेप नसेल. पठाण हा चित्रपट पहायचा की नाही हे आता आम्ही गुजरातच्या सुजाण नागरिकांवर सोडतो.”