नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘स्क्वीड गेम’ (Squid Game) ही कोरियन वेब सीरिज जगभरात तुफान गाजली. नुकतीच या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाली. त्यापाठोपाठ आता नेटफ्लिक्सने ‘स्क्वीड गेम’मधून प्रेरणा घेत एक नवीन रिॲलिटी शो लाँच करत आहे. ‘स्क्वीड गेम: द चॅलेंज’ असं या शोचं नाव असून त्याचे एकूण दहा एपिसोड असतील. विशेष म्हणजे हा शो जिंकणाऱ्या विजेत्याला खूप मोठी रोख रक्कम बक्षीस (cash prize) म्हणून मिळणार आहे. आजवर कोणत्याच रिॲलिटी शोच्या विजेत्याला एवढी मोठी रक्कम मिळाली नव्हती. जगभरातील 456 जण या शोमध्ये भाग घेतील आणि विजेत्याला तब्बल 4.56 दशलक्ष डॉलर्स कॅश प्राइज मिळणार आहे. सुदैवाने ‘स्क्वीड गेम’ या वेब सीरिजमधील कथानकाप्रमाणे यात जीवन-मरणाचा प्रश्न नसेल.
‘स्क्वीड गेम’ या वेब सीरिजमध्ये काही कर्जबाजारी पैसे मिळवण्यासाठी एका शोमध्ये भाग घेतात आणि त्यात हरणाऱ्याला आपला जीव गमवावा लागतो. त्याच काही पारंपरिक कोरियन खेळ खेळले जातात. नेटफ्लिक्सच्या या शोमध्येदेखील ते खेळ आणि त्याशिवाय इतर काही नवीन खेळ असतील. हा रिॲलिटी शो युकेमध्ये चित्रीत केला जाणार असून फक्त इंग्रजी बोलता येणाऱ्या स्पर्धकांनाच त्यात संधी दिली जाणार आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये ‘स्क्वीड गेम’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ती जगभरात सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या 28 दिवसांत तब्बल 1.65 अब्ज तास व्ह्यूज या सीरिजला मिळाले. नेटफ्लिक्सवरील सर्वांत लोकप्रिय सीरिजचा विक्रम स्क्वीड गेमने रचला होता.
या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा होताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. दक्षिण कोरियातील काही कर्जबाजारी लोक पैसे मिळवण्यासाठी एका खेळात भाग घेतात. मात्र आपल्या प्राणाच्या बदल्यात हा पैसा मिळणार असल्याचं त्यांना तिथे गेल्यावर कळतं. जो जिंकतो त्याला प्रचंड पैसा मिळतो आणि जो हारतो त्याला त्याचे प्राण गमवावे लागतात. गेल्या वर्षी ही सीरिज प्रदर्शित झाली तेव्हा ही जगभरात सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली होती.