‘आश्रम’ (Aashram 3) या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनच्या यशानंतर आता तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही सीरिज जितकी लोकप्रिय झाली, तितकाच त्यावरून वादही झाला. यामध्ये अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) मुख्य भूमिकेत आहे. एमएक्स प्लेअरवर आजपासून (3 जून) तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भोपाळमधल्या या सीरिजच्या सेटवर तोडफोड केली होती. इतकंच नव्हे तर दिग्दर्शकांवर शाईफेकसुद्धा करण्यात आली होती. प्रकाश झा (Prakash Jha) यांनी हिंदू आश्रमांचं चित्रण चुकीच्या पद्धतीने चित्रण केल्याचा आऱोप बजरंग दलाने केला. आता यावर अभिनेता बॉबी देओल आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, “मी खूप साधा माणूस आहे आणि जगात जे घडतं त्यापासून मी चार हात लांबच राहतो. माझं कुटुंबही असंच आहे. आम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं आम्ही देऊ. मी एक अभिनेता आहे आणि मी जसा आहे, त्यापासून खूप वेगळ्या असलेल्या भूमिका साकारण्याची माझी इच्छा असते. आपल्या समाजात जे काही घडतं, त्यावर आधारित कथा लिहिल्या जातात, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी समजतील. माझ्या कारकिर्दीत मी पहिल्यांदाच एका वाईट व्यक्तीची, खलनायकाची भूमिका साकारली, जे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. जे मी मुळात नाही ते जेव्हा मी लोकांना माझ्या भूमिकेतून दाखवतो, तेव्हा मला असं वाटतं की मी चांगलं काम करतोय.”
वेब सीरिजच्या वादावर प्रकाश झा म्हणाले, “मी नेहमी म्हणतो की वाद निर्माण करणारे लोक असतील. परंतु आक्षेप घेणार्या त्या प्रत्येकासाठी असे हजारो लोक असतील जे तुमच्या दृष्टीकोनाचे समर्थन करतात. असे लोक असतील जे त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतात. मग आपण कोणाबद्दल बोललं पाहिजे? लोक बोलत राहतील, परंतु मी त्या हजारो लोकांबद्दल विचार करतो जे माझ्या प्रोजेक्टकडे योग्य दृष्टीने पाहतात. दीड अब्ज लोकांनी ती सीरिज पाहिली आणि हा आकडा म्हणजे काही मस्करी नाही.”
बजरंग दलाने सेटवर केलेल्या हल्ल्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम न झाल्याचं प्रकाश झा यांनी सांगितल. “तो फक्त एक तासाचा शो होता. काही जण सेटवर आले, त्यांनी गोंधळ घातला आणि निघून गेले. त्यानंतरही आम्ही त्या दिवसाचं आमचं शूटिंग पूर्ण केलं. आपल्या समाजात अशा गोष्टी होणं अपेक्षित आहे, कारण इथे सर्व प्रकारचे लोक आहेत. ते कसेही वागत असले तरी मी त्यांच्याकडे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच बघतो. ते आले आणि गेले”, असं ते म्हणाले.
‘आश्रम 3’मध्ये अदिती पोहणकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन, श्रिधा चौधरी यांच्याही भूमिका आहेत. यामध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका साकारली आहे.