गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं होतं आणि त्यादरम्यान राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. काही अनपेक्षित उलथापालथही झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आधारित ‘राजी-नामा’ (Rajinama) ही जबरदस्त वेब सीरिज ‘प्लॅनेट मराठी’ (Planet Marathi) ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत ‘राजी-नामा’चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलं आहे. वेबविश्व हादरून सोडणाऱ्या ‘रानबाजार’नंतर अभिजित पानसे आणि ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) ही जोडी पुन्हा एकदा ‘राजीनामा’च्या निमित्ताने एकत्र येणार आहे. प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित ‘राजी-नामा’ची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून आता लवकरच प्रेक्षकांना पुन्हा एकदा सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.
अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे जणू एक समीकरणच आहे. त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके असतात. ‘रानबाजार’ या वेब सीरिजला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘रानबाजार’मधील सत्तानाट्यानंतर आता ‘राजी-नामा’मध्येही ‘खुर्ची’साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’ मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी बोलताना अक्षय बर्दापूर म्हणाले, “नेटफ्लिक्स, अॅमेझॉन यांसारखे प्लॅटफॉर्म्स पाहिले तर तुम्ही फिचर्सची तुलना कराल, पण ते मला कधीही बदलता येतील. कंटेट चांगला असेल तर लोक कसेही येतील. स्कॅम 1992 सारखी सुपरहिट सीरिज मिळायला सोनी लिव्हला पाच वर्षे लागली. प्रत्येक ओटीटीला असं काही मिळत गेलं. आपण सतत चांगला कंटेट टाकत राहलं पाहिजे, हे आमचं लक्ष्य आहे. मग त्याला तुलना राहणार नाही. हिंदी मेनस्ट्रिमसोबत थेट त्याची तुलना करू शकत नाही.”